पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसलेल्या व दिवसातून दहा वेळा वीज खंडित होणाऱ्या शहरात जागतिक दर्जाचा माल तयार होणे जवळजवळ अशक्य आहे.
 आपली ही अशी स्थिती आहे याबद्दल मी झोड उठवू इच्छित नाही. इतिहासाचे वास्तव नाकारण्यात काय हशील आहे? पण या सगळ्या दोषांवर पांघरूण घालायचे, आमच्यात तसे दोष नाहीतच असा आक्रोश करायचा, उलट विदेशी मंडळीच खोडसाळ आणि बदमाश आहेत असा गिल्ला करायचा आणि त्याहीपेक्षा मोठे पाप म्हणजे, अशा अभिनिवेशापोटी, आत्ता आत्ता साऱ्या जगाचे श्वास मोकळे करू लागलेल्या खुलेपणाला कोलदांडा घालायचा नतद्रष्टपणा राष्ट्रवादाच्या नावाखाली करायचा या प्रवृत्तीबद्दल मला दुःख वाटते. आपले दोष मान्य करून ते दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर, कदाचित्, एक दिवस आपण सभ्य आणि स्वच्छ देशांच्या पंक्तीत आपले 'सोवळे' टाकू शकू. अन्यथा, या बोगद्याच्या पलीकडील उजेड आजतरी डोळ्यास दिसण्यासारखा नाही.
 मुंबईच्या 'स्पायरॉसिस' आजाराच्या साथीचा हा निर्वाणीचा इशारा आहे.

दि. ५/८/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ८१