पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिला होता. ज्या देशात अजून प्लेगसारखा साथीचा रोग पसरतो त्या देशाने आपण आधुनिक राष्ट्र असण्याची कितीही बतावणी केली तरी विदेशी ग्राहकाच्या मनाचे समाधान होईल काय? त्यानंतर सूरतमध्ये कोणी एक नवीन तरुण कर्तबगार आयुक्त साहेब आले. लोकांच्या सहकार्याने त्यांनी मोठे धूमधडाक्याचे अभियान चालविले आणि थोड्याच दिवसांत सूरत हे आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचा बोलबाला होऊ लागला. प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी सूरतला गेलो, तेवढ्यात त्या आयुक्तांची बदली कोण्या दुसऱ्या ठिकाणी झाली होती.
 मुंबईतील या नव्या रोगाची साथ आटोक्यात आणायची असेल तर काही किमान कार्यक्रम तातडीने पुरा करावा लागेल. मुंबईतील केरकचरा आणि सांडपाणी यांच्या निचऱ्याची व्यवस्था दुपटी तिपटीने मोठी करावी लागेल. मस्जिद बंदर इत्यादी भागांत लोहमार्गाच्या बाजूने एवढ्या मोठ्या आकाराच्या घुशी मनमानी करीत फिरताना दिसतात, की ही छोट्या बांध्याची डुकरांची काही उपजाती तर नव्हे, असा संशय यावा. उंदीर, घुशी संपविण्याची प्रचंड मोहीम हाती घ्यावी लागेल. त्यासाठी मनेकादी पर्यावरणवाद्यांनादेखील मुसक्या बांधून ठेवावे लागेल. अखेरीस, मुंबईचा नागरी प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत 'जगण्या'साठी येणाऱ्या लोकांचा महापूर थांबवावा लागेल; एवढेच नाही तर उलटवावा लागेल. साथीचा रोग लहानसा; पण त्याचा बंदोबस्त करावयाचा असेल तर गेल्या पन्नास वर्षांतील यच्चयावत् आर्थिक-सामाजिक धोरणांना उलटवावे लागेल. अन्यथा, सभ्य राष्ट्रांच्या पंक्तीत भारताला प्रवेश मिळण्याची शक्यता नाही.

 कोणाही मुलीचा बाप किंवा आई मुलगी दाखवायला न्यायची म्हणजे तिच्या गुणांचे यथार्थ आणि अवास्तव गुणगान करतातच; त्याहीपेक्षा, तिचे दोष सहजी दिसून येणार नाहीत असे प्रयत्न करतात. रंग थोडा उजळ दिसावा, डोळ्यातील तिरळेपण लक्षात येऊ नये, उंची थोडी अधिक दिसावी इत्यादी इत्यादी. राम गणेश गडकऱ्यांच्या बाळकरामाने ठकीच्या वधूपरीक्षेत सांगितलेले सर्व उपाय केले जातातच. मुलगी आजारीच असली, क्षयाची किंवा कोड इत्यादीची बाधा असली तर मग विचारायलाच नको!
 जागतिकीकरणात भारताची परिस्थिती काहीशी अशीच आहे. आपला माल आपण पसंतीसाठी नेतो तो चांगल्यात चांगला बनवून नेण्याची शर्थ उद्योजक हरप्रकारे करतात. पण, त्यांच्या प्रयत्नांना काही मर्यादा आहेत. घाणीने बरबटलेल्या, उंदीरघुशींचा सुळसुळाट असलेल्या, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसलेल्या,

अन्वयार्थ – दोन / ८०