पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते ओझे साहेब आपल्या डोक्यावर का घेताहेत! खर्चाची रक्कम एकूण कारभाराचा आवाका पहाता तशी किरकोळ. पण, साहेबाची ख्याती पैशाची टाकटुकी करण्याबद्दल होती. मग, हे काय नवल वर्तले?
 साहेबांनी आपणहूनच स्पष्टीकरण दिले, त्यांना काय सांगू? येथे वीज नाही म्हणून सांगू? आपल्याकडे दिवसातून दहा वेळा वीज जाते आणि सार्वजनिक सेवांतील नोकरवर्गही केव्हाही संपावर जातो हे त्यांना मी सांगितले तर ते माझ्याबरोबरचे संबंधच तोडून टाकतील. आम्ही विणकामाचे कपडे तयार करतो. प्रत्येक वेळी वीज बंद पडली, की सारी यंत्रे थंडावतात. पर्यायी व्यवस्था असली तरी मध्ये थोडासा काळ जातोच. त्यामुळे आमच्या विणकामात एक लहानसा दोष राहतो. आम ग्राहकाच्या तो लक्षातही येत नाही, पण जाणकारांच्या नजरेतून तो सुटत नाही. रोगराईच्या धोक्यामुळे माल परत येण्याचे प्रकरण आताच कोठे आटोपते आहे, त्यात ही नवीन भानगड उपटली, तर मग आमचा कारभारच आटोपला.
 विदेशी सारे बदमाश आणि आपण मात्र सारे स्वच्छ धुतल्या तांदळासारखे अशी आपली सर्वांची खात्री असते. माझ्या राहत्या जागी परतलो. दूरदर्शनवर, मुंबईतील नव्या गूढ साथीच्या आजाराने २६ माणसे दगावली आणि हजारो माणसे इस्पितळांत तपासणीसाठी भरती होताहेत, अशी बातमी होती.
 नुकताच मुंबईत बेसुमार पाऊस झाला. गटारे, नाल्या तुंबल्या. रस्यांच्या नद्या झाल्या, लोहमार्ग पाण्याखाली गेले. चांगल्या चांगल्या वस्तीतही पाणी पार बाहेरच्या दाराच्या उंबऱ्यापार्यन्त येऊन पोहोचले. साहजिकच, पाणी उंदीरघुशींच्या बिळांतही घुसले. परिणामी, मुंबईभर वाहणारे पाणी उंदीरघुशींच्या विष्ठेने व मुताने भरलेले होते. हजारो माणसे अशा पाण्यातून चालत राहिली. भायखळ्यासारख्या भाजीबाजारात अशा पाण्यातच बुचकळून भाजीपाला, फळे स्वच्छ करून खरेदीसाठी ठेवण्यात आली. या प्रदूषणाचा काहीही अंश नागरी पुरवठ्यात उतरणे शक्यच नव्हते असे छातीठोकपणे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त साहेबही विश्वासाने सांगू शकणार नाहीत.
 मी जे दूरदर्शनवर पाहतो आहे, ऐकतो आहे हे जर आमच्या कपडा निर्यातदार साहेबांच्या विदेशी ग्राहकाने ऐकले, पाहिले तर भारतीय माल घेण्यास तो कितपत उत्सुक राहील असा विचार साहजिकच मनात आला.

{gap}}मागे सूरत शहरात प्लेगने हैदोस घातला. तिथल्या कारखानदारीवर आणि निर्यात व्यवसायावरही मोठा विपरीत परिणाम झाला. त्या वेळीही हा प्रश्न उभा

अन्वयार्थ – दोन / ७९