पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक शान होती. सिक्कीम प्रकरण व आणीबाणी यांमुळे सारे चित्र पालटले आणि भारताची गणना हुकूमशाही राष्ट्रांच्या पंक्तीत होऊ लागली. भारतीय म्हणून ताठ मानेने जगणे इंदिराबाईंच्या आणीबाणीने अशक्य केले.
 १ मे १९७६ रोजी आणीबाणीच्या ऐन भरात मी सहकुटुंब मुंबई विमानतळावर उतरलो. टॅक्सी घेऊन दादर स्टेशनवर आलो. तोपर्यन्त, आणीबाणी म्हणजे काही वेगळे असल्याची पुसटशीही जाणीव झाली नाही. आता भारतात आगगाड्या वेळेवर धावतात अशी फुशारकी ऐकली होती; पण आमची पुण्याकडे जाणारी गाडी चांगली अर्धा तास उशिरा आली. अजूनही आणीबाणीची काही गाठभेट नाही. गाडीत चढल्यावर पहिल्या वर्गाच्या डब्यात मात्र वातावरण वेगळे असल्याचे जाणवले. गाडीचा उशीर या विषयावर मी काही शेरा मारताच शेजारच्या प्रवाशाने तोंडावर बोट ठेवून काही न बोलण्याचा इशारा केला. मुंबई-पुणे गाडी म्हणजे सर्व राजकीय घटनांवर तावातावाने वादविवाद करण्याचे हिंदुस्थानातील 'हाईड पार्क मैदान'च! त्या गाडीतील नीरव शांतता लोकांच्या मनांत आणीबाणी आणि पोलिसांची दडपशाही यांचा किती खोलवर धाक पोहोचला आहे याची जाणीव देत होती.
 कोणी काही बोलू लागले आणि त्याला पोलिसांनी येऊन अटक केली असे काही कुठे पुण्याला पोहोचल्यानंतरही पाहण्यात आले नाही; पण 'काही बोलले, कोणी ऐकले तर मध्यरात्री दरवाजावर थाप पडेल,' असे 'अ'च्या बाबतीत झाले; 'माझ्या माहितीतल्या 'ब'ची अशी प्रत्यक्ष हकिकत आहे, बिचाऱ्याची बायकापोरे उघडी पडली' अशा वदंता वारंवार ऐकू येत.
 जमीन घेऊन मी आंबेठाण येथे शेतीकामाला लागलो. पहिले बटाट्याचे पीक घेतले. बाजारात भाव नसल्यामुळे पिकाची अरण लावून ठेवण्याचे ठरले. त्यासाठी कडुनिंबाच्या डहाळ्या शोधत शेजारच्या गावी गेलो. लोक सैरावैरा धूम पळत होते. जो तो ज्याला त्याला 'गाडी आली आहे' एवढाच निरोप देत होता. गाडी म्हणजे नसबंदीवाल्यांची गाडी. या गाडीने इतका पराक्रम गाजवला की, घोडे पाणी पीत नसेल तर 'पाण्यात संताजीधनाजीप्रमाणे नसबंदीवाले दिसतात की काय?' असे विचारण्याची लोकांवर वेळ आली. एक दिवस दिल्लीच्या गलीच्छवस्ती निर्मूलनाची बातमी छापून आली. गावातल्याच एका माणसाशी मी बोललो. तो पटकन् म्हणाला, म्हणजे ही जुनी राजेशाहीच परत आली म्हणायची?

 आणीबाणी संपली. जनता पक्षाच्या स्थानिक उमेदवाराकरिता मी भरपूर धावपळ केली. पण सर्वत्र वातावरण अजून काँग्रेसचेच होते. निकाल लागला,

अन्वयार्थ – दोन / ५७