पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमचा उमेदवार पडला. साऱ्या देशभर असेच झाले असणार अशा कल्पनेने उदासवाणेपणाने घरी परतलो. रेडिओवरच्या बातम्यांचा कल तर अगदीच वेगळा होता. त्या रात्री शेवटी इंदिराबाईंचा पराभव झाल्याची बातमी ऐकली आणि जनसामर्थ्याच्या या विराट विश्वरूपदर्शनाने, इतके रोमांच अनुभवले, की पहाटेपर्यन्त डोळ्याला डोळा लागला नाही.
 जनता पक्षाचे सरकार आले. आनंदीआनंद जाहला. पण काही महिन्यांतच कांद्याच्या निर्यातीवर बंदी आली. चाकणचे कांदा आंदोलन सुरू झाले. जनता पक्षाचे सरकार आल्याबरोबर शेतकरी आंदोलन उठले तेव्हा, हा शरद जोशी हा कोणी काँग्रेसी हस्तक असावा असा होरा दिग्गज पत्रकारांनी मोठ्या विश्वासपूर्वक मांडला. पुढे इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. आंदोलनाने उग्र स्वरूप घेतले. आपला होरा चुकल्याचा कबुलीजबाब देण्याची प्रथा भारतीय पत्रकारितेत नाही. सत्याग्रहात अटक झाली. लोकांचा संपर्क येऊ नये म्हणून आम्हा पाचदहाजणांना औरंगाबादजवळच्या हर्सल तुरुंगात नेऊन ठेवले. तुरुंग कसला? इतिहासकालीन घोड्यांच्या पागा आता तुरुंगातील बराकी म्हणून वापरात येत होत्या. भिंतींवर ढेकणांची जत्रा. संडास जुन्या औरंगजेबाच्या काळातील; बसल्यावर खालची टोपली फूटदीडफूट अंतरावर. सारा गलीच्छ प्रकार. जमेची बाजू एवढीच, की बराक मोकळी. ज्याला पाहिजे तेथे त्याने आपली पथारी मांडावी. जेल सुपरिटेंडेंट सांगत होता, संडासाबद्दल तक्रार करू नका. माझ्या घरी असाच संडास आहे. त्यामुळे बायको माहेरी निघून जाण्याची भाषा सतत बोलत असते. आता काहीच नाही, आणीबाणीच्या काळात तुम्ही पाहायला पाहिजे होते. इतके स्थानबद्ध की एकमेकांना चिकटून झोपायला लागे आणि तरीही संडासच्या पार दरवाजापर्यन्त पथाऱ्या पसरलेल्या रहात. माणसे इतकी, की सकाळी तासाभरात संडास भरून जायचा.

 माझ्या अंगावर शहारे आले. हिंदुस्थानभर पावणेदोन लाख लोक बाईने असे गुरांसारखे कोंडून ठेवले; पण त्याची आता कुणाला चीड राहिली नाही, संताप राहिला नाही; सारे कसे शांत शांत! आणीबाणीच्या अठरा महिन्यांत ही सारी अमानुषता सोसणाऱ्यांची सारी तपश्चर्या फुकट गेली.
 शेतकरी संघटनेच्या झेंड्याभोवती जमा झालेल्या पाईकांत त्या वेळच्या सामाजिक, आर्थिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते होते. छात्रयुवा संघर्ष वाहिनी आणि राष्ट्र सेवा दल यांतील कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात भाग घेत होते. अमर हबीब, सुधाकर जाधव, दशरथ सावंत, भीम

अन्वयार्थ – दोन / ५८