पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोक हे गबाळे, बुळे आणि याउलट, पाकिस्तानी म्हणजे शूर, कडवे व लढवय्ये अशी सर्वदूर कल्पना होती. इस्रायलने भोवतालच्या अरब फौजांची जशी दाणादाण केली तशीच पाकिस्तानी वायुसेना हिंदुस्थानची आठवड्याभरात करून टाकेल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. आमच्या कार्यालयातील, एरवी सज्जनपणे वागणारे पाकिस्तानी सहकारीही मिशीला तूप लावून फक्त पाकिस्तान रेडिओवरील 'खबरें' ऐकत होते. भारतीय सैन्याची आगेकूच चालू राहिली तसतसे वातावरण बदलत गेले. भारतीय फौजेविषयी आदराची भावना वाढत गेली. बांगलादेशातील पाकिस्तानी फौजांनी शरणागती स्वीकारली तेव्हा एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने माझ्या कार्यालयीन कक्षात येऊन 'मी काही शरणागती दिली पाहिजे असे नाही' असे म्हणून तणाव सारा संपवून टाकला.
 लक्षावधी बांगलादेशी निर्वासित हिंदुस्थानात येत होते. त्यांच्या सचित्र बातम्या सर्व दृक्श्राव्य माध्यमांतून प्रसिद्ध होत होत्या. एक इंग्रज अधिकारी मला बोलून गेले, तुमच्या देशात हे सारे घडत असताना तुमच्यासारख्या माणसाला परदेशात ठेवणे तुमच्या सरकारला परवडते कसे? इंग्रजच तो! त्याच्या बोलण्यातला छुपा अर्थ स्पष्ट होता. अशा परिस्थितीत तुम्ही येथे आरामात जगू शकताच कसे?" मनात एक टोच राहिली.
 १९७४ मध्ये एक नवी कलाटणी मिळाली. सिक्कीम भारताच्या आधिपत्याखालील एक स्वायत्त संस्थान. १९७४ मध्ये इंदिराबाईंनी सिक्कीम भारतात सामील करून घेतले. सिक्कीम आणि भूतान यांना संयुक्त राष्ट्रसंघात स्वतंत्र मान्यता देण्याचा त्या वेळी विचार चालला होता. सिक्कीमचे सामीलीकरण म्हणजे बांगलादेश लढाईच्या विजयोन्मादात भारताने सुरू केलेला नवा साम्राज्यवाद आहे आणि त्यामागे वारंवार दुर्गादेवी अवतार धारण करून निवडणुका जिंकण्याची इच्छा आहे असे बहुराष्ट्रीय समाजात वाटत होते.

 पुढच्याच वर्षी आणीबाणी जाहीर झाली. विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांची धरपकड, देशभर पसरलेले भीतीचे वातावरण आणि वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी यासंबंधी विस्तृत बातम्या युरोपमधील वर्तमानपत्रांत येत होत्या. त्यामुळे हुकुमशाहीविरुद्ध लढा करण्यासाठी स्वित्झर्लण्ड सोडून मी हिंदुस्थानात आलो असे म्हणणे धादांत खोटे असेल. माझ्या परत येण्याची कारणे राजकारणाशी नाही, अर्थकारणाशी जोडलेली आहेत; पण हेही इतकेच खरे की, आणीबाणी जाहीर झाली नसती तर स्वदेशी परतण्याचा निर्णय इतक्या सहजपणे मी घेतला नसता. पंडित नेहरूंच्या काळापासून साऱ्या संयुक्त राष्ट्रसंघात भारताची एक आब होती आणि भारतीयांची

अन्वयार्थ – दोन / ५६