पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्वाही दिली होती, की हा साऱ्या देशाच्या हितशत्रूचा प्रचार आहे असे वाटत होते... ही असली कोडगी आत्मसमर्थने दिली जात आहेत.
 इतिहासात असे घडते. आणीबाणी जाहीर झाली त्याच्या आधी महिनाभर मी पश्चिम जर्मनीत गेलो होतो. पश्चिम जर्मनीत गेले की हिटलरच्या अनुयायांच्या कवायती, विरोधकांना आणि ज्यूधर्मीयांना जेथे अनन्वित छळाला तोंड द्यावे लागले ते तुरुंग ही अजून कुतूहलाची पर्यटनस्थाने होती. बऱ्याचशा जर्मन लोकांशी मी बोललो. हिटलरच्या चढत्या काळात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी नेमके काय केले?" या प्रश्नावर बोलणे आले की सगळ्यांची तोंडे चिडीचूप बंद होत. हिटलर असे काही राक्षसी थैमान घालत आहे हे आमच्या कधी लक्षातच आले नाही. पण, घडले ते फार वाईट घडले आणि नवे जर्मन राष्ट्र हा सगळा इतिहास पुसून टाकून खरेखुरे लोकशाही राष्ट्र बनत आहे अशी मखलाशी सर्वत्र ऐकू येई.
 यशाचे पितृत्व सांगणारे अनेक उभे राहतात, अपयश नेहमीच पोरके असते अशी एक इंग्रजी म्हण आहे. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास काही वेगळा घडला असता. भयंकर संहाराची अस्त्रे दोस्त राष्ट्रांच्या हाती येण्याऐवजी हिटलर किंवा जपानी टोजो यांच्या हाती असती, दोस्तांचा पराभव झाला असता आणि सर्वत्र शुद्ध आर्य वंशाची हुकूमशाही झाली असती तर आज कानांवर हात ठेवणारे विश्वामित्र कदाचित् नव्या व्यवस्थेत मग्रुर अधिकारी म्हणून दिसले असते.

 भारतातील आणीबाणीची कथा त्याहून विचित्र आहे. आणीबाणीचा शेवट निवडणुकीने झाला. आणीबाणीच्या क्रूरकर्मा शिल्पकारांना लोकांनी धूळ चारली. पण, पर्यायी जनता पक्षांच्या नेत्यांचे विदूषकी चाळे पाहिल्यावर दीड वर्षात त्याच बदनाम क्रूरकर्त्यांना जनतेने निवडून दिले हे एक अद्भूतच आहे. १९८१ मध्ये लोकांनीच इंदिरा गांधींना आणि त्यांच्या पक्षाला निवडून दिले म्हणजे विजनवासाची दोन वर्षांची सजा देऊन माफी करून टाकली. अशाही परिस्थितीत संजय गांधींचे जिगरी दोस्त सोडल्यास अजूनही झाले ते योग्यच झाले; तशीही वेळ आली तर पुन्हाही आणीबाणी लादण्यास आम्ही कमी करणार नाही असे कोणी ताठ मानेने बोलत नाही. १९७७ सालच्या निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम चालू होती तेव्हा त्या वेळचे इंदिराभक्त, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे खजिनदार श्री. शरदचंद्ररावजी पवार सांगत होते, की आणीबाणी संपलेली नाही. निवडणुकांत लोकांच्या पसंतीचे शिक्कामोर्तब झाले, की पुन्हा एकदा वरवंटा फिरू लागणार आहे. येरवड्याच्या तुरुंगातून विरोधकांना बाहेर पाठविले आहे ते तुरुंगाची

अन्वयार्थ – दोन / ५४