पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रंगसफेदी करण्याच्या सोयीसाठी. तेवढे काम उरकले, की सगळ्यांना पुन्हा तुरुंगात डांबण्यात येईल. त्या वेळी पक्षनिष्ठेची भाषा करणारे आता तोच पक्ष आणि त्याच्या नेत्या यांच्याविरुद्ध मर्दपणे बंड करण्यास ठाकल्याचा आव आणीत आहेत.
 आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य नागरिक आणि छोटे कार्यकर्ते दडपशाहीविरुद्ध बोलत होते, प्रचार करीत होते; पण नामवंत सर्व चुप्पी साधून होते. सरकारी महात्मा विनोबा भावे यांनी आणीबाणीला 'अनुशासनपर्व' असे प्रशस्तिपत्रही देऊन टाकले. महाराष्ट्रात दुर्गाबाई भागवत यांचा अपवाद वगळता दुसऱ्या कोणी ऐन आणीबाणीच्या काळात धैर्य दाखविल्याचे दिसत नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना वाचा फुटली; त्यांची रसवंती खुलली आणि आपण जन्मजात स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते व हुकूमशाहीचे कडवे विरोधक असल्याच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या.
 आणीबाणीच्या कालखंडाचा आणि माझा फार किरकोळ संबंध आलाः पण तरीही माझ्या काही आठवणी लिहून ठेवतो. ते पुढेमागे कधीकाळी ऐतिहासिक अवलोकनास उपयोग व्हावा म्हणून.

 लाल बहादूर शास्त्रींचे ताश्कंद येथे निधन झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शपथविधीनंतर त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम माझ्या दिल्ली येथील कार्यालयात शास्त्रीजींच्या स्मरणार्थ काढलेल्या टपालतिकीटाच्या प्रकाशनानिमित्त झाला. मृत व्यक्तींविषयी अनादराने बोलू नये; पण इंदिराबाई माझ्या आदराचा विषय कधीच नव्हत्या. पैतृक वारशाने अंगावर आलेले प्रचंड जबाबदारीचे ओझे सावरण्याची आपली कुवत आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्या मनात जबरदस्त शंका आणि त्यातून निघणारी असुरक्षिततेची भावना व त्यातून देशाला मोठा धोका संभवतो याची जाणीव त्यांच्या त्या वेळच्या भाषणातूनच झाली. त्यानंतर लगेचच मी फ्रान्स आणि स्वित्झर्लण्ड येथे गेलो. त्यानंततरच्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाची झालेली पडझड, भ्रष्टाचाराची प्रकरणे, गुजराथ व बिहार येथील विद्यार्थ्यांची बेकारीविरोधी आंदोलने, रेल्वे कामगारांचा संप हा सगळा आणीबाणीचा पूर्वरंग घडला. त्या काळात मी देशोदेशी फिरून अविकसित देशांतील गरीबीचे कारण शोधीत होतो.
 १९७१ मध्ये बांगलादेशचा स्वातंत्रयसंग्राम आणि मुक्तता झाली. पहिल्यांदा बाईंच्या कर्तबगारीबद्दल अभिमान वाटला. खुद्द अटल बिहारीजींनीही त्या वेळी त्यांचे 'दुर्गादेवी' म्हणून कौतुक केले. परदेशांतील बहुराष्ट्रीय समाजात हिंदुस्थानातील

अन्वयार्थ – दोन / ५५