पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





आणीबाणी : एक विफल कारावास


 २५ जून २०००, इंदिराबाईंनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा पंचविसावा स्मरणदिन. काही पत्रकारांनी याला रौप्यमहोत्सवही म्हटले; पण रौप्यमहोत्सव सुखद घटनांचा असतो. आणीबाणीबद्दल कुणाचेही काही मत असो, रौप्यमहोत्सव म्हणून उत्साहाने साजरा करण्यासारखी ही घटना आहे असे म्हणणारा कोणीही सुपुत्र, अगदी इंदिरा काँग्रेस पक्षाच्या पठडीतही नाही.
 आणीबाणीच्या काळात आणि त्यासंबंधाने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि निभावणाऱ्या अनेकांनी त्यासंबंधीच्या आठवणी लिहिल्या आहेत. आणीबाणीचा हा साराच कालखंड देशाच्या इतिहासातील एक लज्जास्पद, काळा इतिहास आहे. मूलभूत हक्कांची पायमल्ली, दीडपावणेदोन लाख लोकांचा तुरुंगवास, लॉरेन्स् फर्नाडिस, स्नेहलता रेड्डी यांच्यासारख्यांचा तुरुंगात अनन्वित छळ, पोलिसांची अरेरावी, सक्तीची नसबंदी या असल्या घटनांमध्ये आपला काय सहभाग होता याची कबुली देणारा एकही मायेचा पूत पुढे आलेला नाही.
 आणीबाणीच्या कालखंडाचे खरे खलनायक आता कोणी हयात नाहीत. शेषनसाहेब लोकप्रियतेच्या झोतात आहेत. एन. के. सिंग हे आणीबाणीत तुरुंगवास सोसलेल्या पंतप्रधानांचे प्रमुख सचिव आहेत. त्यांपैकी कोणीच लोकांची क्षमा मागितलेली नाही.

 काँग्रेस आय् च्या परिवारातील बहुतेकांनी कानांवर हात ठेवून विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. आम्हाला काही कळलेच नाही हो! २५ जून रोजी सकाळी वर्तमानपत्रे आली नाहीत याचाच काय तो अचंबा वाटला; बी. बी. सी. वरून बातम्या येत त्यांवरून काहीतरी जगावेगळे चालले आहे अशी शंका वाटत होती; पण, इंदिराबाईंनी विरोधी पक्षांची कारस्थाने आणि त्यांना मिळणारे परकीय हस्तकांचे प्रोत्साहन यांसंबंधी इतक्या तारस्वरात आणि इतक्या वारंवार निक्षून

अन्वयार्थ – दोन / ५३