पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करायला निघाला तर 'बहुतेक सारे दुःखाने गांजलेले' अशाच निष्कर्षाला आला असता.
 विश्वास ठेवा, ठेवू नका; प्रत्यक्ष आकडेवारी याच्या अगदी उलट आहे. बाजारपेठेचा अभ्यास करण्यात तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या Roper Starch या कंपनीने गेल्या वर्षी जगी सर्व सुखी असा कोण आहे? याचा जगभर शोध घेतला. त्यांच्या अहवालानुसार, भारतीय पृथ्वीतलावरील सर्वांत सुखी लोकांपैकी प्रमुख आहे; भारतीयांपेक्षा सुखी, थोड्याफार प्रमाणात, फक्त अमेरिकन लोक आहेत; फ्रान्स इंग्लंडमधील नागरिकही भारतीयांपेक्षा कमी सुखी आहेत.
 या अहवालामुळे सर्वांत मोठा हलकल्लोळ माजला आहे. दूरदर्शनवर सकाळी नित्यनेमाने प्रवचने सांगणारे बाबा आणि महाराज या अहवालाचा दाखला देऊन आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व भक्तगणाच्या मनावर ठसवू लागले आहेत. भारतीय खरोखरी जगातील सर्व लोकांत सुखी आहेत काय? पाहणी करणाऱ्या कंपनीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या; तुमच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात काय? तुमच्या मिळकतीबद्दल तुम्ही खूश आहात काय? तुमच्या कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंध आनंददायी आहेत काय? धर्म आणि देव यांच्या आयुष्यातील स्थानाबद्दल तुम्हाला संतोष वाटतो का? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे गोळा केली. ती गणकयंत्रात घालून त्यांवर बेरीज, गुणाकार आदी संख्याशास्त्रीय प्रक्रिया केल्या आणि अहवाल तयार झाला.
 बहुसंख्य भारतीयांनी आपण सुखी असल्याचे का सांगितले असावे?
 एक कारण, आत्मप्रौढी हे असू शकते. भारतीय माणूस घरात खायला दाणा नसला तरी कणगीला 'मोत्यासारख्या ज्वारी'ची पोती लागल्याची प्रौढी चावडीवरील गप्पांत मिरवितो. 'आपल्या दुःखाची जाहिरात करून काय मिळणार आहे? उलट, आपण दुःखी असल्याची कबुली दिली तर औंदा पोरीचं लगीन जमायला वांधे होतील' असा सुज्ञपणाही भारतीयांत भरपूर आहे.

 दुसरेही एक कारण असू शकते! 'खाली पाहून चालावे' ही फार जुनी शिकवण आहे. 'बूट नसल्याने मी दुःखी होतो, पण जेव्हा पायच नसलेला माणूस पाहिला तेव्हा त्याच्या तुलनेने आपण कितीतरी बरे याची जाणीव होऊन आनंद वाटला' असे तुलनेने समाधान मानायला भारतीयांना भरपूर वाव आहे. नोकरी नाही, उद्याची शाश्वती नाही अशा माणसालाही झोपडपट्टीतील कंगाल, भणंग, दरिद्री, आजाराने पिडलेल्या माणसांशी तुलना करता 'आपले बरे चालले आहे,' असे समाधान वाटून घेता येते. गरिबी, कंगालपण आणि दुःख जागोजाग

अन्वयार्थ – दोन / ३७