पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सुखी माणसाचा सदरा


 शाळेतल्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकात एक धडा होता - सुखी माणसाचा सदरा. कोण्या एका राजाच्या वैद्याने सुखी माणसाचा सदरा घालावयास मिळाला तर राजाची व्याधी दूर होऊन तो खडखडीत बरा होईल असे निदान केले. राजाची सारी फौज सुखी माणसाच्या शोधात निघाली. पण, कोणीही प्रजाजन आपण सुखी असल्याचे सांगेना. अखेरीस, सकाळपासून कष्ट करून घामाने निथळणारा, थंड सावलीला बसलेला एक लाकूडतोड्या भेटला, 'मी सुखी आहे,' तो म्हणाला. शिपायाने त्याच्याकडे त्याच्या सदऱ्याची मागणी केली; पण त्याच्याकडे अंगात घालायलासुद्धा सदरा नव्हता, राजाला देण्याची गोष्ट दूरच राहिली.
 'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' अशी तुकोबांचीही वाणी आहे. सुखाचा आणि संपन्नतेचा काही संबंध नाही अशी आमच्या लहानपणी समजूत होती.
 आता ही समजूत बदलत आहे; पैसा हे सुखाचे साधन आहे अशी सार्वत्रिक धारणा आहे. जिकडे जावे तिकडे सारे दुःखीच दिसतात. कोणाकडे पैसा नाही, कोणाला नोकरी नाही, कोणी गुंड आणि दादा यांच्या धमकावण्यांनी भयभीत झाला आहे, तर कोणी भ्रष्टाचारी पुढाऱ्यांच्या पक्षबदलू प्रवृत्तीमुळे सरकारे पडत गेली तर देशाचे कसे होईल याच्या चिंतेत पडला आहे. देशांच्या संपन्नतावार यादीत आपल्या देशाचा क्रमांक शेवटच्या गटात आहे. निरक्षरता वाढते आहे. यंदा तर सर्वदूर दुष्काळ पसरला आहे. प्यायच्या पाण्यासाठी लोक वैराण भटकत आहेत आणि पाण्याची भीक मागत आहेत.

 अशा परिस्थितीत भोवताली कोणी आपण 'सुखी' असल्याची द्वाही फिरवीत नाही हे समजण्यासारखे आहे. आजचा एखादा तुकोबाराया सुखदुःखाचे मोजमाप

अन्वयार्थ – दोन / ३६