पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओसंडत आहे. तेव्हा, 'तुलनेने आपले बरे चालले आहे' असा संतोष मानण्यास येथे भरपूर वाव आहे.अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात घरचे उरलेसुरले शिळेपाके भीक म्हणून मिळाल्याबद्दल तोंड भरून आशीर्वाद आणि दुवा देणारी प्रजाच फारशी नाही; सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाने खाली कोणाकडे पाहून संतोष मानावा?
 भारतीयांच्या संतोषाला ऐहिक आधार फारसा नाही. मग, भारतीयांचा सुखसंतोष हे त्यांच्या प्राचीन आध्यत्मिक परंपरेचे फळ आहे काय? अहवालावरून तसे दिसत नाही. भारतीय माणूस इंग्लिश किंवा फ्रेंच माणसापेक्षा लौकिक बाबतीत अधिक संतुष्ट असल्याचे सांगतो. याउलट स्थिती कुटुंब आणि धर्मसंस्था यांच्याबद्दल.
 अमेरिकेत निम्मे विवाह घटस्फोटाने संपतात; आत्महत्या आणि मादक द्रव्यांचे सेवन यांचे प्रमाण भरपूर आणि तरीदेखील, अहवालाच्या निष्कर्षानुसार अमेरिकन नागरिक आपल्या कुटुंबातील जिव्हाळ्याबद्दल भारतीयांपेक्षा अधिक सुखी आहेत. देव आणि धर्म ही तर भारतीयांची मोठी निष्ठेची स्थाने; पण अहवालाचा निष्कर्ष अगदी वेगळा आहे. पाश्चिमात्य जगातील माणूस धर्म आणि परमेश्वर यांना अधिक महत्त्वाचे स्थान देतो. आता, अहवालाच्या या निष्कर्षाचा अन्वयार्थ लावायचा कसा? दरिद्री भारतीय त्याच्या आर्थिक स्थितीविषयी संतुष्ट! आणि कुटुंबातील जिव्हाळ्याबद्दल असंतुष्ट! आणि सर्व गोळाबेरीज करता जगातील लोकांत भारतीय दुसऱ्या क्रमांकाने सुखी?

 अहवालाच्या निष्कर्षात काही तथ्य असते तर परदेशी दूतावासांच्या समोर तेथे जाऊन स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या झुंबडी दिसल्या नसत्या. पाहणी करणाऱ्या निरीक्षकांना दिलेली तोंडी उत्तरे काहीही असोत, भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता महाराजांनी पटवून दिल्यावर गच्च भरलेल्या मंडपातील श्रोतृवृंद कितीही मोठा टाळ्यांचा कडकडाट करीत असो; 'आपण सुखी आहोत काय?' या प्रश्नाचे उत्तर भारतीय वाचेने देत नाहीत, हात वर करून देत नाहीत; शक्य होईल तेव्हा, शक्य होईल तेथे देश सोडून निघून जातात - एका अर्थाने भारतीय आपले खरे मत पायाने स्पष्ट करतात.
 महात्मा जोतिबा फुले यांनी हिंदू धर्मग्रंथांतील चमत्कारिक घटनांची एका वाक्यात वासलात लावून टाकली - असल्या खल्लड ग्रंथांत तर्कसंगती ती काय शोधायची? ब्रह्मदेवाला चार तोंडे, शरीराच्या प्रत्येक अवयवातून त्याला गर्भधारणा होते आणि आपल्याच मुलीच्या मागे तो कामपिसाट होऊन लागतो. सत्य आणि

अन्वयार्थ – दोन / ३८