पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/288

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक नवी कलाटणी मिळाली.
 अणुबाँबच्या प्रचंड संहारक शक्तीमुळे अमेरिका व रशिया या महासत्तांनीसुद्धा समग्र युद्धाची शक्यता टाळली आणि कडेलोटच झाला तर, कोरिया, व्हिएतनाम यांसारख्या मर्यादित युद्धांपलीकडे मजल जाऊ दिली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या साऱ्या लढाया अण्वस्त्रे हाती असूनसुद्धा पारंपरिक शस्त्रास्त्रांनीच लढल्या गेल्या. दोन्ही महासत्तांच्या हाती सारे जग हजार वेळा उद्ध्वस्त करण्याची ताकद असूनही त्यांच्या नेत्यांनी वेळोवेळी सुज्ञपणा दाखवला आणि प्रलय टाळला. समाजवादी रशिया बुडाला; तरीदेखील आपल्याबरोबर जगही बुडविण्याची बुद्धी कम्युनिस्ट नेत्यांनीसुद्धा दाखविली नाही.
 अणुशक्तीच्या धाकाने जगात शांती नांदण्याच्या या परिस्थितीचे काही महत्त्वाचे परिणाम झाले.
 पहिला परिणाम म्हणजे अणुशक्ती वापरण्याकरिता लागणारा सुज्ञपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्या हाती अणुशक्ती जाऊ नये असे प्रयत्न अणुशक्तिधारी महासत्तांनी चालविले; तथापी अनेक छोट्यामोठ्या देशांनी अणुबाँबस्फोटासाठी लागणारी तांत्रिक आणि आर्थिक क्षमता तयार केली.
 वाटाघाटी किंवा चर्चा यांचे गुऱ्हाळ संयुक्त राष्ट्रसंघात किंवा इतरत्र वाटेल तितके लांबत ठेवता येते आणि निर्णायक युद्ध होऊच शकत नाही अशा कोंडीच्या परिस्थितीत जागोजागी असंतुष्ट समाजात आतंकवादाचा उगम १९७० सालानंतर झाला. विमाने पळविणे, बाँबस्फोट घडवून आणणे आणि टपालाने स्फोटके पाठविणे आणि मानवी बाँब अशी वेगळीवेगळी साधने अतिरेकी चळवळीने वापरण्यास सुरुवात केली. मादक द्रव्यांच्या जागतिक व्यापाराचा या अतिरेक्यांना चांगला आधार मिळाला.
 काही देशांच्या राज्यकर्त्यांनी राष्ट्रीय सशस्त्र दलांचा वापर करण्याऐवजी या अतिरेकी टोळ्यांचाच वापर राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी किंवा निदान शत्रूस जेरीस आणण्याकरिता केला.
 हिरोशिमावरील अणुस्फोटानंतर ११ सप्टेंबर २००१ रोजी इतिहासात एक अशी घटना घडली, की ज्यामुळे माणसामाणसातील आणि देशादेशातील तंटे कसे सोडवावे या विषयावरील सर्व विचार आमूलाग्र तपासून पाहण्याची गरज तयार झाली.

 अणुबाँबची संहारक शक्ती पाचदहा देशांपेक्षा जास्त देशांकडे जाण्याची शक्यता नाही. अणुबाँबचे तंत्रज्ञान हस्तगत झाले तरी शस्त्र म्हणून वापरण्याच्या

अन्वयार्थ – दोन / २९०