पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/289

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पद्धतीचा बाँब तयार करणे हे मोठे महागडे काम आहे. शत्रूवर अणुबाँबचा वर्षाव करण्याकरिता लागणारी विमाने, क्षेपणास्त्रे किंवा गुप्तहेरांची जाळी फारच थोड्या राष्ट्रांच्या आवाक्यातली आहेत.
 गेल्या ११ सप्टेंबर रोजी एका नवीन हत्याराचा जन्म झाला. त्याकरिता काही संशोधन लागले नाही, फारसा खर्चही आला नाही; पण परिणामी होणारा विध्वंस, महत्त्वाच्या उद्दिष्टांपुरता, अणुबाँबइतकाच विध्वंसक; पण त्यातून प्रलयाचा फारसा संभव नाही. हे हत्यार वापरण्याकरिता फौजांचीही आवश्यकता नाही.
 १९७० सालापासून विमानांच्या चाचेगिरीचे शास्त्र अतिरेक्यांनी चांगलेच अंगी बाणले आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेस झुकांडी देऊन शत्रुराष्ट्राच्या नागरी विमानात प्रवेश मिळवायचा, विमानाने उड्डाण केले म्हणजे हाती असलेल्या किंवा नसलेल्या शस्त्रांचा धाक दाखवून आपल्याला सोयीस्कर विमानतळावर विमान उतरवून घ्यायचे, प्रवाशांना ओलीस धरून अतिरेक्यांनी आपल्या मागण्या मनवून घ्यायच्या, खंडणी पदरात पाडून घ्यायची आणि स्वतःचीही सुटका करून घ्यायची असे हे साधे; पण भयानक तंत्र. काही प्रसंगी प्रत्यक्षात विमाने पेटवून देण्यात आली. प्रवासी हताहत झाले. प्रवाशांनी त्याचीही सवय करून घेतली. विमानप्रवास आणि वाहतूक कमी होण्याऐवजी भूमिती श्रेणीने वाढत गेले. टोलेजंग आकाराची विमाने इंधनाचा प्रचंड साठा घेऊन शेकडो प्रवाशांसह जगभरच्या आकाशात फिरू लागली.

 ११ सप्टेंबर २००१ रोजी विमानाच्या चाचेगिरीच्याच तंत्राचा एक नवा अध्याय सुरू झाला, ज्याने जगाचा इतिहास बदलणार आहे. नव्या हत्याराचे तंत्र सोपे आहे. विमानाच्या चाच्यांनी आपला जीव वाचविण्याची कल्पना सोडून द्यायची आणि भरले विमान ताब्यात घेऊन ते शत्रूचे सर्वाधिक नुकसान होईल अशा जागी नेऊन आपटायचे.११ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी. एकाच तासात चार जंगी विमाने पळविली गेली; त्यांतील दोन न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनच्या, जगातील सर्वात उंच, जागतिक व्यापार केंद्राच्या दोन मनोयऱ्यांवर जाऊन आदळली. त्यामुळे झालेल्या आगडोंबाची उष्णता इतकी मोठी, की इमारतीतील सिमेंटच्या बांधकामातील लोखंडी गज वाकून दोन्ही मनोरे कोसळले. हल्ल्याच्या वेळी तेथे पन्नास हजारावर माणसे काम करीत होती. किती जगली, किती दगावली याचा हिशेब आजही लागलेला नाही. हे मनोरे म्हणजे अमेरिकेतील वित्तीय कारभाराचे आणि माहिती व्यवस्थेचे प्रतीक आणि केंद्रस्थान होते. फक्त बारा लोकांनी

अन्वयार्थ – दोन / २९१