पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/287

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






घातपाती आणि घायकुती


 प्पन वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धाचे लांबत चाललेले शेपूट झटकन संपविण्याकरिता अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांनी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुबाँबचा हल्ला करण्याचा आदेश दिला. बाँबहल्ला झाला आणि अणुशक्तीच्या प्रचंड उत्पाताने सारे जग विस्मित आणि भयभीत होऊन गेले. माणसाच्या हाती एवढे संहारक हत्यार आले म्हणजे आता जगाचा विनाश अटळ आहे आणि फारसा दूर नाही अशी धास्ती जगभरच्या सामान्य माणसांनाही वाटू लागली. जगामधील तंटे, वादविवाद त्या काळापर्यंत चर्चेने, वाटाघाटींनी सोडवण्याचा प्रयत्न केला जाई; ते नच जमले तर आर्थिक हत्यारे वापरून प्रतिपक्षास जेर करण्याचा प्रयत्न होई. तेही जमले नाही तर अखेरचा पर्याय म्हणून सशस्त्र लढाईचा मार्ग चोखाळला जाई. दारूगोळ्याचा शोध लागेपर्यंत तलवारी- धनुष्यबाणांच्या लढाया, लढणाऱ्या सैनिकांच्या यातनांनी मोजमाप केले तर, सर्वांत भयानक होत्या. ज्या काळी शस्त्रक्रियेचे शास्त्र आणि तंत्र अगदीच मागासलेले होते, भूल देण्याचे तंत्रही अवगत नव्हते, प्रतिजैविकांचा (Anti-biotics) शोध लागला नव्हता अशा काळात जखमी झालेल्या सैनिकांना काय वेदना सोसाव्या लागत असतील याची कल्पनाही करणे कठीण आहे. दारूगोळ्याचा वापर होऊ लागला त्यामुळे जखमी सैनिकांच्या वेदना कमी झाल्या, पण युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या भूमितीश्रेणीने वाढली.

 जपानवर अणुबाँब पडण्याच्या आधी रणगाडे वापरले जात होते, विमानांतून बाँबवर्षाव होत होता, युद्धात देशच्या देश बेचिराख होत होते, हजारोंनी माणसे मरत होती; पण युद्धामुळे साऱ्या पृथ्वीचाच विनाश ओढवू शकेल अशी काही परिस्थिती नव्हती. हिरोशिमावरील अणुबाँबच्या हल्ल्याने माणसामाणसातील आणि देशादेशातील तंटेबखेडे कसे सोडवायचे यासंबंधीच्या साऱ्या विचारांना

अन्वयार्थ – दोन / २८९