पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्तमानपत्रांचा ढीग आला. पहिल्या पानावरील महत्त्वाची जागा चौधरींसाठी गेली. आतल्या पानावर, इंग्रजी वर्तमानपत्रांत, अगदी गुलाबी कागदावर छापल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय वर्तमानपत्रांतही कुंभाचा मुख्य गोषवारा व्यवस्थित दिला होता. जमलेल्या गर्दीचे आणि मंचाचेही चांगले मोठे फोटो छापून आले होते. कुतूहलाने फोटोखालील ठळक टाईपातील मजकूर वाचला आणि टंच फुगलेल्या फुग्याला टाचणी लागावी तशी अवस्था झाली. विश्वसनीयतेकरिता विख्यात असलेल्या वर्तमानपत्रांतही फोटोखाली 'किसान कुंभ खुलिकरणाला आणि WTOला विरोध करण्याकरिता भरला होता' असे चक्क छापले होते. काय म्हणावे या कर्माला? कपाळाला हात लावून बसलो. हे असे घडलेच कसे? खुलासा देणारे पत्रक काढले, टेलिफोनवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांशी संपर्क साधला. तथ्य निघाले ते एवढेच, की असोसिएटेड प्रेसचा कोणी कॅमेरावाला कुंभाच्या वेळी हजर होता, त्याने फोटो काढले. आपलाआपला स्वतंत्र फोटोग्राफर प्रत्येक ठिकाणी पाठविण्याऐवजी अशा व्यावसायिक छायाचित्रकाराने काढलेला फोटो बहुतेक वर्तमानपत्रे विकत घेतात. कॅमेरावाले भाषण कसले ऐकतात आणि दिलेल्या पुस्तिका कसल्या वाचतात! शेतकरी जमले म्हणजे ते WTOचा विरोध करण्याकरिताच असणार अशी त्यांची त्यांच्या डाव्या बुद्धीतून झालेली खात्री. त्यांनी फोटोंच्या मागे 'WTO विरोधी मेळावा' असल्याचे लिहून टाकले आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दिवसांच्या नव्हे, वर्षानुवर्षांच्या परिश्रमाला तडा पाडला.
 दुःखात सुखाची गोष्ट बरी, की महाराष्ट्रातील बहुतेक वर्तमानपत्रांनी कोणताही गोंधळ घातला नाही. हिंदी वर्तमानपत्रांतील बातम्याही व्यवस्थित आहेत. तोंडघशी पडली ती फक्त उच्चभ्रू, गुलाबी पृष्ठांची इंग्रजी वृत्तपत्रे आणि त्यांचे वाचक.
 एक दिवस असा उगवतो, एक घटना अशी घडते, की साऱ्या अहंकाराचा फुगा फुटावा. घटना लहानशी; पण साऱ्या आयुष्याच्या परिश्रमाविषयी प्रश्नचिह्न उभे करणारी!

दि. २१/४/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / २०८