पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोस्ती अधिकच मजबूत झाली. रशियन फौजांविरुद्ध लढणाऱ्या गनिमी टोळ्यांना शस्त्रास्त्रे आणि साधने यांचा पुरवठा पाकिस्तानमार्फतच होऊ शके, त्यामुळे पाकिस्तानच्या हाती मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आली. त्या मस्तीत पाकिस्तानने काश्मिरमध्ये आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन दिले. जगभरच्या आतंकवादाला विरोध करणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानच्या या धोरणाकडे दुर्लक्ष केले; सद्दामविरुद्ध किंवा लादेनविरुद्ध जितपत कारवाई केली तितपतसुद्धा पाकिस्तानविरुद्ध केली नाही. थोडक्यात, पाकिस्तान अमेरिकेशी पहिल्यापासून अधिक जवळिक साधून आहे.
 प्रेसिडेंट क्लिंटन यांच्या काळात या पक्षपाती धोरणात काही फरक घडून येऊ लागला. भारताने पोखरण येथे अणुचाचण्या केल्या, पाकिस्ताननेही जवाबी चाचण्या केल्या. तेव्हापासून, काश्मिर विवादातून जगाला होरपळून टाकणारा संघर्ष तयार होण्याची भीती निर्माण झाली. अमेरिकेने प्रथमच भारताच्या भूमिकेस पाठिंबा दाखवला आणि पाकिस्तानच्या धोरणाबद्दल काहीशी नापसंती दाखविली. अतिरेक्यांच्या कारवायांना विरोध करण्याबद्दल हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन्ही देशांतील नेतेमंडळी एकसुरात घोषणा करू लागली. गेले काही महिने अमेरिका पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानच्या अधिक जवळची आहे असा भास तयार झाला होता. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारतभेटीमुळेतर भाजपा गटातील मुखंडांना जितं मया, जितं मया झाले होते. भारतभेटीस जोडून क्लिंटन पाकिस्तानातही जाणार या घोषणेमुळे या सगळ्या विजयोत्सवावर पाणी पडले आहे. राज्यकर्त्या पक्षातील काही जहाल मंडळीतर भारताने आता क्लिंटन यांची भेट, काही मुत्सद्दी कारण सांगून, नाकारावी असेही सुचविले आहे.
 क्लिंटन यांच्या पाकिस्तानभेटीत तसे वावगे काही नाही. पाकिस्तानातील लष्करी हुकूमशहांना काही फायदा मिळेल असे काही करणे अमेरिकेलाही परवडणारे नाही. याउलट, अमेरिकेतील पाकिस्तानी जनता ज्यामुळे दुखावेल असेही काही करणे त्यांना करणे शक्य नाही.
 पाकिस्तान आणि भारत यांच्या संयुक्त भेटीमुळे, कोणा मध्यस्थाच्या मदतीने काश्मिरप्रश्नावर वाटाघाटी करण्याची वेळ आली तर क्लिंटन यांची त्या कामाकरिता गुणवत्ता अधिक स्पष्ट होईल.

 क्लिंटन यांनी आतापर्यंत आयर्लंड आणि इस्रायल यांच्यातील वादात हस्तक्षेप करून समझौते घडवून आणले आहेत. काश्मिर प्रश्नातही काही तोड काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांची फारा दिवसांची इच्छा आहे. भारताला भेट देताना

अन्वयार्थ – दोन / १६