पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे उपरोधाने का होईना लिहिणाऱ्या कवीने, "जो श्रीमंत तोच कुलीन, तो विद्वान, तोच सुंदर ठरतो," असे म्हटले; पण श्रीमंत शूर ठरतात असे नाही म्हटले. आताच्या जगात श्रीमंत हाच शूरही ठरतो. उपरोधाने नव्हे तर खऱ्याखुऱ्या अर्थाने. ज्याच्याकडे संपत्ती तोच कला, साहित्य, विज्ञान आणि साहजिकच राजनीतीवरही प्रभाव पाडतो.
 संपत्तीची फूटपट्टी
 अर्थकारणातील सत्ता कोणाच्या हाती? प्रचंड मोठ्या व्यक्तिगत भांडवलदारांचे दिवस संपले. कंपन्यातील भागधारक आपल्या मतांनी अर्थकारण चालवितात; पण अर्थकारणातील मतदानात सरसकट दरडोई एक मत अशी पद्धत नाही. ज्याच्या हाती जितके समभाग त्या प्रमाणात त्याची मतदानाची ताकद कंपनीच्या सर्वसाधारण सभेत सगळी सभा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एकटादुकटा भागधारक असे चित्र दिसले, तरी प्रत्यक्ष मतदानात एकटा-दुकटा भागाधारक जिंकू शकतो. राजकारणात (साहजिकच सहकारात) डोकी मोजून निर्णय होतो. अर्थकारणात निर्णयाचे बरेवाईट परिणाम ज्याला जितके भोगावे लागणार त्या प्रमाणात त्याचा निर्णयावर अधिकार ठरतो.
 साहित्य, कला, विज्ञान वेशीबाहेर
 विद्वान, कलाकार, शास्त्रज्ञ इत्यादी दुर्मीळ गुणवानांना त्यांच्या खास क्षेत्राबाहेर सर्वसाधारण समाजात विशेष मान नसावा हे समजण्यासारखे आहे. आपल्या तपस्येच्या, व्यासंगाच्या, स्वरांच्या, सुरांच्या आणि रंगाच्या ब्रह्मानंदी कैफात आकंठ बुडालेल्यांना राजदंडाचे किंवा अर्थसत्तेचे काय सोयसुतक असायचे? "तू भला धनवान असलास तरी मीही शास्त्रवेत्ता आहे; तू लढाईत जिंकतोस तर मी वादविवादात; तुझ्याकडे नोकरचाकर असतील तर माझीही शिष्यपरंपरा आहे. तू मला मानत नसशील तर मीही तुला तुच्छ मानून निघून जातो." अशी निःस्पृहता भर्तृहरीसारखे विद्वान दाखवीत. आता ही जात शिल्लक नाही. ही गोष्ट अलहिदा.
 शापादपि शरादपि

 शस्त्रे कारखान्यात तयार होतात; पण त्यामागील विज्ञान संशोधकांचे आणि वैज्ञानिकांचे असते. कारखानदारांनी राजकारणावर मात केली खरी; पण अजून वैज्ञानिकांनी कारखानदारांवर मात केलेली नाही. अणुबॉम्ब तयार करण्याची शक्यता दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पष्ट झाली तेव्हा राजकारण्यांच्या हाती असले भयंकर अस्त्र येऊ नये असे प्रयत्न काही वैज्ञानिकांनी एकत्र येऊन केले; पण सफल झाले नाहीत. वैज्ञानिकांचा लढा आजही जास्तीत जास्त बौद्धिक

अन्वयार्थ - एक / १००