पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपदेच्या हक्काकरिता आहे. समाजातील सार्वभौम सत्ता हाती घेण्याचे त्यांच्या मनाला अद्याप शिवलेलेही नसावे. जेम्स बाँडसारख्या कादंबऱ्यांत एखाद्या अफलातून शोधामुळे, जगातील सर्व सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणारा खलनायक दाखविला जातो. उद्या कदाचित महाभयानक अस्त्र-पृथ्वीचा विनाश करण्याची ताकद असलेले अस्त्र हाती असलेला कोणीही शास्त्रज्ञ सर्व पृथ्वीचे अपहरण करू शकेल.
 काठीने म्हैस आणि मान्यता
 प्लेटोने तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर राज्यपद मिळालेल्या तत्त्वज्ञाची कल्पना मांडली होती. विद्वान आणि वैज्ञानिक यांच्या हाती सत्ता पुढेमागे येईलही; पण ती हिंसाचार करण्याच्या त्यांच्या ताकदीने येईल, व्यासंगाच्या आणि संशोधनाच्या तपस्येमुळे नाही.
 राजकारणात शिरगणती; अर्थकारणात संपत्ती अशा लहानमोठेपण ठरविण्याच्या साध्या-सोप्या आणि निश्चित फूटपट्ट्या आहेत. विद्वता, विज्ञान, कला या क्षेत्रात काही फूटपट्ट्या असल्या तर त्या स्पष्ट नाहीत. विद्यापीठाचे कुलगुरू विद्वत्तेच्या आधाराने ठरतात असे स्वतः कुलगुरूही म्हणणार नाहीत. राजकीय सत्तेचा आणि धन सामर्थ्याचा उपयोग यांच्या आधारानेच विद्वान श्रेष्ठ ठरतात. लेखककवींचे कंपू बसतात. निवडणुकांची राजकारणे करतात. लेखक मोठा कोण? कवी मोठा कोण? हे ठरवायचे कसे? सरकारी पाहितोषकांच्या रूचीने? पारितोषके आणि खप, मागणी आणि रसिकांची गर्दी या फूटपट्ट्या राजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रातील आहेत. साहित्य, संगीत, कला, मागणी आणि रसिकांची गर्दी या फूटपट्ट्या राजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रांतील आहेत. साहित्य, संगीत, कला, विज्ञान क्षेत्रांतील नाहीत. या गुणवाणांना समाधान देणारी दाद दुसऱ्या गुणवंतांची; पण त्या दादीने भाकरी मिळत नाही; रेफ्रिजरेटर आणि गाडीतर नाहीच नाही! विद्यापीठात कला, विज्ञानासंबंधी संस्थांत त्यांची त्यांची स्वतंत्र्य सार्वभौम सत्ताकेंद्रे तयार करायची म्हटली तर निवड कोणत्या निकषाने व्हायची हे ठरणेच कठीण आहे.
 मनुष्य अजूनही रानटी आहे. ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस हाच नियम सगळीकडे लागू आहे. काठी पूर्वापारपासून शस्त्रधाऱ्यांच्या हाती राहिली, आता ती उद्योजकांच्या हाती राहिली, उद्या वैज्ञानिकांच्या हाती जाईल. श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी म्हशीहाक्याची काठी हातात घेणे एवढा एकच मार्ग असेल तर ते मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

(८ जुलै १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १०१