पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हाती नाही. शस्त्रे तयार करणाऱ्या सगळ्या आर्थिक-सामाजिक व्यवस्थेच्या हाती गेली. युद्धांवर अर्थकारणाने वर्चस्व बसवले.
 टका सेर भाजी, टका सेर खाजा
 अजूनही आफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा खंडांतील अनेक देशांत हे घडते. लष्करातील कोणी अधिकारी उठतो; राजधानीच्या रस्त्यातून रणगाडे फिरवतो आणि केवळ शस्त्राच्या जोरावर सत्ता हाती घेतो. शस्त्र एवढेच त्याच्या सत्तेचे समर्थन. सुसंस्कृत देशात शस्त्राने सत्ता मिळत नाही. ठरावीक कालावधीकरिता सत्ताधारी निवडले जातात. निवडणुकीत मतपेट्या पळविण्यासाठी, मतकेंद्र हातात घेण्यासाठी, एखाद्या उमेदवाराला संपविण्यासाठी इत्यादी इत्यादींसाठी शस्त्रांचा वापर होतो. निवडणुकीत लोकांची दिशाभूल करण्यासाठी, 'गरिबी हटाव'सारख्या घोषणांपासून 'अयोध्या मंदिरापर्यंत' दुष्ट प्रकार केले जातात; पण शेवटी निर्णय मतपेटीत पडलेल्या मतपत्रिकांच्या मोजणीने ठरतात. राजकीय सत्ता कोणाच्या हाती असावी हे ठरविण्यात कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. सैन्याच्या सरसेनापतीने मनात आणले तर सगळी सत्ता तो काबीज करू शकतो; पण मतपेटीसमोर गेल्यावर त्याला मत एकच, रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या बेकार, अशिक्षितालाही एकच मत, महाप्रकांड विद्वानालाही एकच मत, सौंदर्याला प्रतिभेच्या स्पर्शाने मूर्तरूप देणाऱ्या कलाकारालाही एकच मत.
 "शंभरात एक माणूस शूर निपजतो; हजारात एक पंडित, दहा हजारात एखादा वक्ता जन्मतो. दानशूर क्वचितच जन्माला येतो." असे संस्कृत वचन आहे. मतपेटीसमोर शूर, पंडित, वक्ते, दानी सारे एकसारखे. मतपेटीसमोर येण्याआधी आपल्या अंगच्या गुणांनी इतर मतदात्यांना आपल्या इच्छेप्रमाणे मते वापरू शकतात; पण एकच धनुष्य, तलवार, तोफेची नळी या सगळ्यांची जागा मतपत्रिका घेत आहे. ज्याला जास्त मते मिळतात त्याच्या हाती सत्ता अशी ही साधी सोपी पद्धत आहे.
 अर्थस्य पुरुषो दास

 राजकारणावर अर्थकारणाने ताबा मिळविला आहे, केवळ शस्त्रे उत्पादन करण्याच्या शक्तीमुळे नाही. लढाया रणांगणापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. सैन्यातील जवानाइतकीच शत्रूच्या हल्ल्याचा धोका सामान्य नागरिकालाही आहे. सैन्याची ताकद केवळ शस्त्राच्या ताकदीवर व पल्ला यांवर न ठरता लष्कराच्या मागे उभ्या असलेल्या वाहतूक, संचार, खानपान, साधने इत्यादींवर ठरते. अर्थप्रबळ राष्ट्र हेच शस्त्रप्रबळ ठरू लागले. 'सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते'

अन्वयार्थ - एक / ९९