पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुर्मीळ नवजीवन साहित्याची पुस्तके गांधीवादी बाळगतात पुष्कळ, वाचतात फार कमी. आमच्या या परंपरेस धरून डंकेल विषयाचे वादंग उफाळले.
 प्रा. मधु दंडवते म्हणाले, "३० लाख टन गव्हाची आयात डंकेलमुळेच करावी लागली."
 "शेतकऱ्यांना आपली पिके राखता येणार नाहीत." दुसरे शहाणे म्हणाले. असल्या भाकडकंथावर रणधुमाळी माजली. खरे काहीच नाही; पण तपासून पाहणार कोण?
 प्राध्यापकांची ही स्थिती! मग बलराम जाखडांसारख्यांचे काय विचारावे? "शासन शेतकऱ्यांचे नुकसान कदापि होऊ देणार नाही," अशी गर्जना करून ते मोकळे झाले. अहवालातील कोणत्या वाक्याने संकट येणार आहे ते सांगण्याची जबाबदारी कोणाचीच नाही.
 डंकेल प्रस्तावाने उठलेल्या खळबळीचे खरे कारण काहीही असो, त्याचा डंकेलच्या वाचनाशी काही संबंध नाही. म्हणजे या वादंगामुळे लेखी शब्दाचा अजून काही प्रभाव असू शकतो, त्यांच्या जीवात अजून धुगधुगी आहे असा अर्थ निघत नाही. उलट लेखी शब्द साफ मेला आहे असे दाखवतो.
  'हेचि फल काय..?'
 माझ्या नात्यागोत्यातील कुटुबांत माझ्या कामासंबंधी कौतुक तर सोडाच, पण जिज्ञासाही नाही. माझ्या उपसिथतीत शेती शेतकरी आणि तत्ससंबंधी विषय कटाक्षाने टाळण्याचा शिष्टाचार सगळेजण पाळतात. कुटुंबातील एक दुःखद घटना म्हणून माझ्याकडे सगळे पाहतात; पण परवा एकदम बदल झाला, महाविद्यालयात जाणारी माझी एक भाची थोडे दिवसांपूर्वी मला पाहिल्याबरोबर तिच्या शाळेत जाणाऱ्या भावाला म्हणाली, "परवा परखमध्ये पाहिले ना ते हे अंकल, त्यांचा ऑटोग्राफ घे!" लिखित शब्दाचा यापेक्षा अधिक निश्चयात्मक मृत्युलेख काय असू शकेल?

(१७ जून १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ९७