पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. डंकेल हा एक अमेरिकन व्यापारी आहे, त्याने हिंदुस्थानवर कब्जा बसवायचे ठरवले आहे; डंकेल हा स्वीस सावकार आहे, तो हिंदुस्थान विकत घेऊ इच्छितो; डंकेलचे म्हणणे मानले गेले तर शेतकऱ्यांना शेतीच करता येणार नाही. त्यांची पिके, जनावरे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हस्तक घेऊन जातील... एक ना अनेक, काय वाटेल त्या अफवा गावात पसरत होत्या. साहजिकच 'ये डंकेल बला क्या है?' असे पंजाबच्या अगदी कोपऱ्यातील शेतकरीसुद्धा विचारू लागला. शासन दुप्पट भावाने गव्हाची आयात करून पंजाबी शेतकऱ्याला बुडवीत होते; पण शेतकऱ्यांना खरी दहशत वाटत होती ती डंकेल साहेबांची.
 वाचणे आमचा धर्म नोहे
 शहरात डंकेलविषयी आपल्याला माहिती नाही असे दाखवणे बुद्धिवादी विशेषतः प्राध्यापक मंडळी अप्रतिष्ठेचे समजू लागली. परवा परळी वैजनाथ येथे एक कार्यक्रम संपल्यानंतर बाजूला हिरवळीत मी कार्यकर्त्यांशी गप्पागोष्टी करत बसलो होतो. एक सज्जन तिथे येऊन बसले, चेहऱ्यावरून वकील असावेत. आपला परिचय देण्याची बात नाही. मध्ये घुसल्याबद्दल दिलगिरी नाही! 'हे डंकेल काय आहे ते मला सांगा,' एवढीच त्यांची फर्माईश. मागणीपेक्षा मागणीच्या पद्धतीने मला मोठे विचित्र वाटले.
 मी म्हटले, "आपण डंकेलचा अहवाल वाचून या; मगच त्याविषयी आपण चर्चा करू."
 "मी डंकेल अहवाल वाचला आहे," सद्गृहस्थ दाटून म्हणाले.
 "पण अशा बतावणीने बनण्याइतके दूधखुळे कोणीच राहीले नाही. तुम्ही डंकेल अहवाल वाचलेला नाही." मी निक्षून म्हटले.
 "मी वाचला आहे." त्यांची ग्वाही.
 मी तितक्याच जबरीने, "तुम्ही डंकेल वाचलेला नाही," असे म्हटल्यावर मग त्याने कबूल केले, की त्याने कोण्या वर्तमानपत्रात डंकेलविषयी वाचले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याची नाही, आंतरराष्ट्रीय व्यापाराची नाही, शेतीची नाही, कोणत्याच संबंधित क्षेत्रातील काडीमात्र जाणकारी नसतानासुद्धा काही सुटत नाही.
 निरक्षर प्रध्यापक आणि मंत्रीही

 तसे यात नवीन काही नाही. भारतीय बुद्धिवंतांची ही परंपरा आहे. मार्क्सचे एखादे पुस्तक मुळात वाचलेला मार्क्सवादी ही हिंदुस्थानात, डाव्यांच्या सुवर्णकाळातही उंबराच्या फुलाइतकीच दुर्मीळ गोष्ट होती. हिंदुधर्माचा व्यापक गोषवारा देणारे एखादे पुस्तक तरी वाचलेला संघाचा स्वयंसेवक तितकाच

अन्वयार्थ – एक / ९६