पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उलटसुलट चर्चा कोकणातल्या अगदी बारक्याशा खेड्यातसुद्धा होत असे. याउलट आता जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यातालुक्या नव्हे, अगदी गावगल्लीतसुद्धा लेखणीचे हत्यार परजणारे शूरवीर उदंड झाले. पुरवठा इतका अफाट वाढला, की किमत घसरणारच. वर्तमानपत्रातील कोणा अग्रलेखाने किंवा एखाद्या पुस्तकाने समाज वरपासून खालपर्यंत घुसळून टाकला आहे असे आता होत नाही. अगदी शेवटी म्हणजे आचार्य अत्र्यांना ते थोडेफार जमले; त्यानंतर कोणालाच नाही.
 पण लक्षात कोण घेतो?
 वृतपत्रातील लिखाण काही असले तरी ताजे असते, पुस्तकाचा विषय ते छापून होईपर्यंत शिळा होतोच. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाने समाजाला उभे हलवले आणि बदलले असे फारसे होत नाही. बुके उदंड जाहली; पण 'लक्षात कोण घेतो' आता होत नाही. इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध होत असताना, नवीन अंक घेऊन येणारे जहाज अमेरिकेत पोचण्याच्या वेळी बंदरावर हजारो उत्सुक वाचकांचा जमाव एकत्र येई आणि बोट लागता लागताच डेकवरील प्रवाशांना कादंबरीच्या नायकनायकांची ताजी खबर विचारीत. असे आता कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. विक्रम सेठ यांची नवी कादंबरी सध्या खूप गाजत आहे. लेखकाची टॉलस्टायशी तुलना होत आहे; पण त्या पुस्तकाचे कौतुक मूठभरांना. सर्वसाधारण समाज त्याबद्दल उदासीन आहे.
  'सर्वदूर सिद्धांत' संपले
 अर्थशास्त्राच्या जगात समाजव्यवस्थाच नव्हे अगदी राज्यव्यवस्थासुद्धा उलथवून टाकणारे ग्रंथ एकेकाळी झाले. सगळ्या आर्थिक चलनवलनाचा संदर्भच बदलून टाकणारे ग्रंथराज १९३० सालापर्यंत प्रकाशित होत. ॲडम स्मिथचा ग्रंथ या नमुन्याचा पहिला आणि लॉर्ड केन्सचा 'सर्वदूर सिद्धांत' हे बहुधा शेवटचे उदाहरण. त्यानंतर कितीएक महान अर्थशास्त्री झाले; महाकष्टाने जमा केलेली प्रचंड आकडेवारी आणि माहिती गणकयंत्राच्या साहाय्याने विश्लेषण करून पुढे मांडणारी कित्येक पुस्तके झाली; अर्थशास्त्रज्ञांना दरवर्षी 'नोबेल प्राईस'चा रतीब चालू झाला; पण लोकांची डोकी साफ धुऊन काढून त्यांना एक नवी स्वच्छ समज देणारा 'सर्वदूर सिद्धांत' पुन्हा झाला नाही.

 आता न्यूटन होत नाहीत. डार्विन होत नाहीत, लुई पाश्चर होत नाहीत. मादाम क्यूरी होत नाहीत. याचा अर्थ संशोधन होत नाही असा नाही; त्यापेक्षा प्रचंड संशाधन होत आहेत; पण 'क्वांटम थिअरी'चा जनक कोण? आणि

अन्वयार्थ - एक / ९४