पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



डंकेल आणि लेखी शब्दाचा मृत्यूलेख


 लेखी शब्द मेला आहे; संयुक्त राष्ट्रसंघाचे एके काळचे अवर महासचिव फिलिप द सेन यांचे हे प्रसिद्ध वाक्य आहे. "परमेश्वर कधीकाळी असेल; पण आता तो जिवंत नाही." या उक्तीइतकेच सेन साहेबांचे हे निदान तीन दशकांपूर्वी गाजले.
 चोपडी उदंड जाहली
 लेखी शब्द मरण पावला, म्हणजे काही लिखाण थांबले आहे असे नाही. उलट लेखी आणि छापील शब्दांचा महापूर जगभर थैमान घालतो आहे. छपाईचा जुना काळ संपला. जुळाऱ्याने एक एक खिळा करत मजकूर बांधत मग सगळी चौकट छपाईयंत्रावर चढवावी आणि सगळे काही सुरळीत पार पडले तर, एक एक प्रत हळूहळू छापून निघावी, अशा छपाईचे दिवस संपले. छपाईची अत्याधुनिक साधने लेखकाच्या मनांतील मजकुराच्या लक्षावधी प्रती अगदी क्षणार्धात नाही; पण तास-दोन तासात अगदी सुबक पद्धतीने तयार करू शकतात. दररोज कितीतरी पुस्तके छापून बाहेर पडतात. काही मोजकी थोडाफार काळ गाजतात आणि यथवकाश विस्मृतीच्या उदरात गडप होतात. साहित्य, शास्त्र, कला, एक ना अनेक, हजारो विषयांवरच्या लक्षावधी पुस्तकांचा महाओघ दररोज बाजारात येऊन पडतो आणि तरीही लेखी शब्द मेला हे काही खोटे नाही.
 लोकमान्यांचा प्रभाव

 कदाचित लेखी शब्द मेला तो छपाईच्या सुलभतेने आणि मुबलकतेनेच. लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'च्या काळात वर्तमानपत्रे फारशी नव्हतीच. लोकमान्य स्वतःच अनेकदा जुळाऱ्यापासून टपाल्यापर्यंत सगळी कामे करीत. छापील शब्द मोठा दुर्मीळ आणि म्हणूनच कौतुकाचा विषय होता. लोकमान्यांनी अग्रलेखात वापरलेल्या प्रत्येक वाक्याला नाही शब्दालादेखील मोल होते. प्रत्येक शब्दाची

अन्वयार्थ - एक / ९३