पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नोकरदारांशी टक्कर घेण्याची हिंमत दाखवली होती. नोकरदार सगळे संपावर गेले. ५२ दिवस संप चालला, जनतेच्या लक्षात येऊ लागले, की सरकारी नोकरांचा संप चालू असला, की देश अधिक चांगला चालतो. सरकारी नोकर संप मागे घेण्याचा विचार करीत होते, तेवढ्यात शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद बळकावले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे, नोकरदारांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. संप मिटवून टाकला, नोकरदार जिंकले, शरद पवार जिंकले, जनता हरली, देश हरला.
 देशबुडव्यांना पाहिजे काय?
 हिंदुस्थानसारख्या गरीब देशाला ही नोकरशाही परवडणारी नाही. उद्योग धंद्यांतील अकार्यक्षम आणि महागडी कामगारशाहीसुद्धा परवडणारी नाही. देशाच्या आजच्या बिकट आर्थिक अवस्थेत नोकरशाही आणि कामगारशाही दोघांचीही छाटणी आवश्यक आहे; पण देशद्रोहाच्या कटात प्रधानमंत्रीही आहेत, जॉर्ज फर्नाडिसही आहेत आणि शरद पवारही आहेत.

 नोकरदारांना गोंजारून घेण्याची ही प्रवृत्ती का उद्भवली? कारण उघड आहे, नोकरशाही कायम आहे आणि मंत्री आपापल्या खुर्चीवर सरासरीने २-१/ २ वर्षांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत. मंत्री हा पुढारी असतो, तज्ज्ञ नसतो. खुर्चीवर बसल्यानंतर नोकरशाहीला आपला गावरान हिसका दाखवायची हिंमत फार थोड्यांत असते. आपण मोठे अभ्यासू प्रशासक आहोत असे दाखवण्याची त्यांना मोठी इच्छा होते, मग थोड्याच दिवसांत सचिव महाशयांच्या तालावर ते नाचू लागतात. एवढ्या काळात आपण कशाकशावर सह्या केल्या आहेत आणि त्यातून काय लफडी उद्भवतील याची त्यांच्या मनात मोठी धास्ती तयार होते अगदी निष्पाप, निष्कलंक मंत्र्यालासुद्धा सेक्रेटरीसाहेब लेखणीचा कचका कधी दाखवतील हे सांगता येत नाही. एखाद्या प्रकरणात थोडा हात होता असा संशय निर्माण झाला तर आपली सगळी राजकीय कारकीर्द खलास होऊन जाईल आणि घरची वाट धरावी लागेल, याची बिचाऱ्याला रात्रंदिवस चिंता पडते आणि थोड्याच दिवसांत तो हाताखालच्या नोकरदारांना आंजारून गोंजारून घेऊ लागतो. ही झाली अगदी पापभीरू (परमेश्वर या जमातीचे रक्षण करो) मंत्र्यांची कथा. मग ज्या मंत्र्यांना कारखानदारी काढायची आहे, कारखानदाराकडून निधी घ्यायचा आहे, भरती होणाऱ्या प्रत्येक नोकरदाराकडून ठोक रक्कम घ्यायची आहे, सरकारी बांधकामातील प्रत्येक चौरस फुटाबद्दल आपला वाटा घ्यायचा आहे, शैक्षणिक साम्राज्य स्थापायचे आहे, जागोजाग शेकडो एकर जमिनी

अन्वयार्थ – एक / ९१