पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






लोकप्रियतेचे रहस्य आणि नोकरशाही!


 बिजू पटनाईक मोठे हिंमतबहाद्दर म्हटले पाहिजेत, किंवा त्यांना अवदसा आठवली असली पाहिजे. स्वातंत्र्यांनंतर इतिहासात सरकारी नोकरदारांना खुलेआम आव्हान देणारे, एक वसंतदादा पाटील सोडले तर, तर ते पहिलेच मुख्यमंत्री असावेत!
 सरकारी नोकरांचा सुटीच्या दिवसात प्रवास करण्याचा भत्ता त्यांनी बंद केला. एवढेच नाही तर रजा घेण्याऐवजी त्या रजेच्या दिवसांचा जादा पगार देण्याची पद्धत त्यांनी बंद करून टाकली. ओरिसा राज्यात भयानक दुष्काळ पडला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी ६०० कोटींच्यावर रुपयांची गरज आहे. राज्यशासनाची पैसे उभारण्याची ताकद नाही आणि केंद्रशासनाने मोठ्या मिनतवारीने ४५ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. या परिस्थितीत बिजू पटनाईक काटकसरीचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
 मौजमजा चाललीच पाहिजे

 अधिकाऱ्यांचे मत याउलट. सगळे राज्य दुष्काळाच्या जबड्यात असले म्हणून काय झाले; सुटीच्या दिवसात प्रवासाचा आनंद लुटण्याचा सरकारी नोकरांचा हक्क काढून घेण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झालीच कशी? सरकारी नोकरांना घरी जाण्याच्या प्रवासासाठी भत्ता आणि प्रवासखर्च मिळतो तेव्हाच त्यांना सुटी हवी असते. एरवी सुटी त्यांच्या काय कामाची? त्यांची नोकरी म्हणजे सुटीच आहे. रजेवर आहे म्हटल्यावर घरची तरी काही कामे करावी लागतात! ऑफिसात असले म्हणजे पंख्याखाली किंवा वातानुकूलित दालनात शांतपणे बसून राहणे आणि समोर जे लीनदीन याचक येतील त्यांच्याकडून कमाई करणे हे सुख सोडून, रजा घेण्याचा मूर्खपणा कोण करेल? आणि त्या रजेच्या ऐवजी सरकारकडून पगाराची रक्कम मिळत असेल तर दुधात साखरच

अन्वयार्थ - एक । ८८