पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाल्यानंतरही लग्नात मिळालेल्या हुंड्याबद्दल असंतोष राहतो. लोभी सासरची माणसे नवोढा सुनेचा जीव घेण्यापर्यंत जातात आणि तितक्याच संख्येने नववधू आत्महत्याही करतात. या सगळ्या प्रकारांना हुंडाबळी म्हटले जाते.
 या अपमृत्यूचे खरे कारण हुंडाच असते हे काही खरे नाही. अशा प्रकरणांचा अनेक वर्षे अनुभव असलेल्या महिला धुरीणांनी या विषयावर अभ्यास केलेले आहेत, त्यांचा निष्कर्ष असा, की लग्नानंतर लवकरच अपमृत्यू झाला म्हणजे तो हुंड्यासाठी झाला असे सांगणे माहेरच्याच नव्हे तर सासरच्या माणसांनाही सोयीचे होते. खरी कारणे कबूल करायला दोन्हीकडची कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने हुंड्यामुळे हे घडले असे कबूल करायला दोन्हीकडची कुटुंबे तयार होतात. नवरा मुलगा आणि मुली यांची मने आणि शरीरे जुळली तर हुंड्यासारख्या बाबींसाठी नवरा बायकोच्या विरुद्ध सहसा जात नाही. अशी मिळवणी झाली किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या पूर्वायुष्यासंबंधी काही वाद निर्माण झाले तर अशा गोष्टीच्या भरपाईपोटी हुंड्याचा हव्यास वाढतो आणि त्यातून शोकांतिका उद्भवतात असा अनुभव आहे. गोष्टी अगदी पराकोटीला गेल्यानंतरसुद्धा माहेरच्या माणसांनी मुलीला सहानुभूती दाखवली, आधार दिला तर तिचा बळी पडत नाही. थोडक्यात, तथाकथित हुंडाबळीच्या प्रकरणी सगळेच पक्ष जवळजवळ सारखेच दोषी असतात.
 संस्कार, दान आणि दक्षिणा
 हिंदुस्थानात हुंड्याची चाल जुनी आहे. आदिवासी टोळ्यांत लग्न हा व्यवहार असतो. मुलगी कमावती असते, त्यामुळे लग्नानंतर सासरचा फायदा होतो आणि माहेरचा तोटा होतो. साहजिकच अशा समाजात मुलीच्या आईबापांना हुंडा द्यावा लागतो.
 हिंदू समाजव्यवस्थेत लग्न हा करार नाही, संस्कार आहे. मुलगी विकली जात नाही, तिचे दान केले जाते आणि दानाच्या वर दक्षिणा धर्मकृत्यात आवश्यक मानली जाते. त्यामुळे मुलगी देताना त्याबरोबर वराला दक्षिणाही द्यावी ही परंपरा आहे, लग्न हा संस्कार आहे, ही कल्पना मान्य केली तर वरदक्षिणेला सिद्धांततः विरोध करणे कठीण होईल. खरे म्हटले तर हुंडाविरोधी कायद्यास हिंदुत्वावाद्यांनी विरोध करायला पाहिजे, कारण वरदक्षिणा हा लग्न संस्काराचा अविभाज्य भाग आहे.
 संपत्तीहीन स्त्रिया

 व्यवहारात मुली जास्त असलेले बाप हुंड्याविरुद्ध बोलतात आणि उपवधू

अन्वयार्थ – एक / ८६