पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. हिंदुस्थानातील कवी, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कारखानदार इ.इ. परभृत तसेच आमचे समाजधुरीणही नक्कल मारणारे.
 कायद्यांचा फायदा पुरुषांनाच
 कायद्यामुळे हिंदू समाजातील स्त्रियांची अवस्था सुधारण्याऐवजी आणखी बिकट झाल्याचे दिसून येते. हिंदू समाजात अनेक बायका करण्याची चाल फार जुनी आहे. मुसलमान व्यवस्थेप्रमाणे कोणत्याही पुरुषास चार बायका करण्याची परवानगी आहे; पण प्रत्यक्षात बहुपत्नीकत्वाची प्रथा हिंदूंतच जास्त प्रचलित आहे. सतत आक्रमणे, बढाया, अशांतता यांनी गांजलेल्या समाजात लोकसंख्येतील पुरुषांचे प्रमाण कमी झाले, की बहुपत्नीकत्व, विधवा विवाह बंदी यांना साहजिक मान्यता आवश्यक होते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समधील तरुण पुरुषांचे मोठ्या प्रमाणावर शिरकाण झाले; पण कॅथालिक वर्चस्वाखालील फ्रान्समध्ये बहुपत्नीकत्वाला मान्यता मिळणे अशक्यच आणि त्यांना धर्मसंस्थेची नसली; तरी सामाजिक मान्यता मिळून गेली.
 अशांततेच्या काळात घरात कोंडल्या गेलेल्या आणि गुलामगिरीचे जिणे जगणाऱ्या स्त्रियांना एकदम घटस्फोटाची परवानगी दिली तर त्या स्वातंत्र्याचा फायदा स्त्रियांना कसा काय मिळणार? पूर्वीच्या काळी नवऱ्याने दुसरी बायको करून आणली तर पहिलीला असह्य यातना होत असणारच; पण निदान तिच्या डोक्यावरचे छप्पर तरी शाबूत असे. घरात निदान धार्मिक विधीत तरी पहिल्या बायकोचा मान कायम राही. पोटाचा प्रश्न तरी भेडसावत नसे. घटस्फोटाचा आणि द्विभार्या प्रतिबंधक कायदा झाल्याने सोय फक्त उनाड पुरुषांची झाली. दुसरे लग्न करायला बंदी झालीच नाही, पहिल्या लग्नाच्या बायकोला काडी मोडून दिली म्हणजे झाले. या दोन्ही कायद्यांचा फायदा पुरुषांना झाला, स्त्रियांना नाही.
 घटस्फोटाच्या कायद्याचा फायदा स्त्रियांना मिळालाच नाही असे नाही. सासर सोडूनही स्वत:च्या पायावर उभी राहण्याची ज्यांची ताकद होती आणि माहेरच्या माणसांचा ज्यांचा आधार तुटलेला नव्हता अशा मोजक्या स्त्रियांनाच या कायद्यामुळे 'लग्नाची बेडी' तोडता आली.
 हुंडाबंदीतही लाभ पुरुषांचाच

 वर्तमानपत्रात दररोज हुंडाबळीच्या बातम्या असतात. कोणी उपवर मुली हुंड्याचा बोज बापावर नको म्हणून जीव देतात. मुलींच्या लग्नाची जबाबदारी पेलवत नाही म्हणून आया आपल्या मुलींसकट विहिरीत उड्या मारतात. लग्न

अन्वयार्थ – एक / ८५