पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पत्रशीर्षाप्रमाणेच. पूर्वी सरकारी पत्र यायचे म्हणजे मिचकूट किंवा खाकीसर रंगाच्या डॉकेटवर वर एका बाजूला ज्याला पत्र लिहायचे त्याने नाव कार्बन कागद घालून लिहिलेले असायचे. खाली सही करणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी सहीवर "मी भीक मागतो, राहण्याची, आपला सर्वांत विश्वासू आणि आज्ञाधारक सेवक" असे लिहून त्याखाली सही करायचा. दिल्लीचा एवढा मोठा व्हाईसरॉय; पण पुण्याच्या एका कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात याच मायन्याखाली त्याने सही केलेली मी प्रत्यक्ष पाहिली आहे.
 स्वातंत्र्य आले आणि सरकारी नोकर सेवक राहिले नाहीत. पत्रांचा मायना बदलला. पहिल्यांदा 'आपला विश्वासू' म्हणून सह्या होऊ लागल्या. आता सरकारकडून सर्वसामान्यांना पत्रे म्हणून येत नाहीत, मेमो येतात. त्यांना बूड ना शेंडा. तृतीय पुरुषी, कर्मणी प्रयोगातील, व्याकरणातील आणि टंकलिखितातील चुकांनी खचाखच भरलेले मेमो हे आजही सरकारी पत्रव्यवहाराचे वैशिष्ट्य. "प्रिय महाशय, आपला विश्वासू, प्रिय, आपला कळकळीचा' हा पत्रव्यवहारातील शिष्टाचार सरकारी अधिकाऱ्यांनी फक्त सरकारातील देवघेवीसाठी राखून ठेवला आहे.
 सेवक मालक बनला

 इंग्रजी अमलाखाली सरकारी अधिकाऱ्यांना सत्ता असे. आजच्याइतकी सर्वंकष नाही; पण ठराविक क्षेत्रात त्यांचा अधिकार चांगला चाले. त्यांचे पगार तुटपुंजेच असत. कोणत्याही खात्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या खालील नोकरवर्गाची ओढगस्तच असायची; पण त्या आर्थिक दुरवस्थेतही त्यांना एक प्रतिष्ठा होती. साधनांची कमतरता आणि मोजके पगार असूनही खात्याकडे सोपवलेली कामे बऱ्यापैकी पार पाडायची. आता परिस्थिती वेगळी आहे. नोकरदारांची सत्ता वाढली आहे. त्यांची सत्ता सगळीकडे चालते. आगगाडीच्या तिकिटापासून ते वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशापर्यंत त्यांच्या ओळखीचा फायदा होतो. शहरातील श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या पार्ट्यांना आता अमलदार लोक सर्रास हजर असतात. विलायती वस्तू, सिगरेट, दारू यांची रेलचेल, कोणत्याही कारखानदारांच्यापेक्षा सरकारी नोकरदारांच्या घरीच जास्त असते. कोणत्याही झगमगाटाच्या बाजारात सरकारी नंबरप्लेट असलेल्या गाड्या मेमसाहेबांना घेऊन उभ्या असतात. विमानप्रवास आणि दूरभाष यांचा उपयोग फक्त नोकदार भाग्यवंतांनाच परवडतो. त्यांची मुले देशातील सर्वांत महागड्या शाळांत शिकतात. परदेशांतील किंवा देशी कारखानदारीकडील नोकरी त्यांची वाटच पाहत असते. निवृत्तीनंतरही

अन्वयार्थ - एक / ८१