पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समाजवाद : एक बकवास
 अंमलबजावणी होवो ना होवो, दोन तीन वर्षांआधीपर्यंत समाजवाद ज्याच्या त्याच्या तोंडी होता.निवडणूक जिंकायला समाजवादाची आरोळी मोठी उपयोगी पडायची. शिवाय दोन जागतिक महासत्तांमध्ये धावपळ करून लभ्यांश साधण्याच्या प्रयत्नात समाजवादाची भाषा मोठी उपयोगी पडे. अमेरिकी सरकारला खिजवण्याचा खेळ त्यामुळे चांगला चाले. या असल्या बोलण्याने कुणी खरेखुरे फसले होते असे नाही. १९७२ मध्ये एक अमेरिकन छोटा व्यापारी मला म्हणाला होता, "या समाजवादाच्या नाटकाने कोणी फसत नाही. तुमच्या देशातील सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांची मुले इंग्लंड - अमेरिकेत शिकायला येतात, रशियात जात नाहीत, तोपर्यंत तुमच्या समाजवादाच्या घोषणा निव्वळ बकवास आहेत, हे आम्ही चांगले ओळखतो."
 आजपर्यंत निदान समाजवाद हे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात परिस्थिती काहीही असो. सोवियत रशिया कोसळला, नेहरूनियोजन कोसळले, काँग्रेस सरकारचे उद्दिष्टसुद्धा राहिलेले नाही. खुल्या बाजारव्यवस्थेकडे आम्ही वाटचाल करणार आहोत, पुन्हा जुन्या व्यवस्थेकडे जाणे नाही असे पंतप्रधान आणि अर्थमंत्री निःसंदिग्धपणे बोलत आहेत. खासगीकरणाला सुरुवात झाली आहे, रुपया परिवर्तनीय झाला आहे. परिवर्तनीय रुपया म्हणजे सर्व समाजवादी स्वप्नांचा अंत्यविधी आहे.
 काही आठवड्यांपूर्वी मध्यवर्ती सरकारातील सर्वोच्च नोकरशहांपुढे पंतप्रधानांनी भाषण केले. भाषणात त्यांनी आता समाजवादाचे भूत उतरवण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष यांच्या या घोषणेनंतर काँग्रेस पक्ष स्वतःला समाजवादाच्या तत्त्वावर श्रद्धा ठेवणारा पक्ष म्हणवूच शकत नाही.
 ना भाजपा, ना काँग्रेस

 धर्मवादी म्हणून भाजपावर बंदी येणार असेल तर असमाजवादी म्हणून काँग्रेस पक्षावरही बंदी येणे अपरिहार्य आहे. पुढच्या निवडणुका जेव्हा केव्हा येतील तेव्हा हा प्रश्न उद्भवणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा कलम २९ अ, परिच्छेद ५, काटेकोरपणे अंमलात आणला गेला तर मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, चंद्रशेखरांचा समाजवादी जनता पक्ष निवडणुकात भाग घेऊ शकतात. कदाचित, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाही भाग घेता येईल. इतर बहुतेक सर्व पक्षांना निवडणुकांबाहेर राहावे लागेल. हे टाळायचे असेल तर आणखी एक घटनादुरुस्ती करून प्रास्ताविकातील इंदिराबाईंनी घुसडलेला समाजवादी हा

अन्वयार्थ - एक / ७७