पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तस्कर गुंडांच्या टोळ्या अनेक असतात, त्यांच्यातही लढाया चालू असतात. इटली, अमेरिकेसारख्या देशांतील माफियांप्रमाणे प्रत्येक टोळीला सत्तेच्या आसपास असलेल्या कोणाचा तरी आधार लागतो. एक टोळी सत्तारूढ पक्षाजवळ गेली तर दुसरी टोळी विरोधी पक्षाकडे जाते. विरोधी पक्ष अस्तित्वात नसेल तर नव्याने एखादा सज्जड विरोधी पक्ष उभाही केला जाऊ शकतो.
 आयातीवरील निर्बंधामुळे तस्कराखेरीज आणखी एक मोठा प्रबळ गट उभा राहिला आहे. सरकारकडून संमतीचा अधिकृत ठसा उमटवून घेऊन राजरोस उजळ माथ्याने माल आयात करून, मक्तेदारीने मुनाफा कमावणे हा आणखीन एक मोठा धंदा. सरकारात घनिष्ठ लागेबांधे असल्याखेरीज ही उजळमाथ्याची तस्करी संभवत नाही. उजळ माथ्याच्या तस्करांकडून पुढारी खुलेआम देणग्या मागून घेऊ शकतात.
 सत्तेचा मद आणि मादकांची सत्ता
 राजकीय सत्तेवर प्रभाव पाडणाऱ्या आणखी एका मादक पदार्थाच्या वाहतुकीच्या आंतरराष्ट्रीय, राजमार्गावर भारत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी मातीमोल भावाने विकली जाणारी वनस्पती युरोपीय किंवा अमेरिकी शहरात पोचली म्हणजे झटक्यात सोन्याच्या नाही रेडियमच्यादेखील शतपटीने मोलाची बनते. भूखंड, तस्करीसारखा हा धंदाही चोरीचा; पण या धंद्यात सरकारी मान्यतेचा शिक्का उठवणे शक्य नाही. एवढेच नाहीतर, मादक पदार्थांच्या व्यापाराकडे डोळेझाक करणेही शक्य नाही. मान्यताप्राप्त सरकारी सहकार्य दुर्लक्ष असल्यामुळे गांजा, चरसाच्या तस्करांना प्रति सरकारे उभारावी लागतात.
 मठ आणि एके-४७
 संरक्षण मिळण्यासाठी जागोजाग अध्यात्माचा, धर्माचा किंवा एखाद्या बाबामहाराजांचा आश्रय घेऊन मठ स्थापावे लागतात. हजारो एकरांची जागा आल्यागेल्याच्या दृष्टीपलीकडे संपादन करावी लागते. आलिशान मोटारी, विमानांचे अगदी जंबोजेटचे ताफेसुद्धा बाळगावे लागतात. पाचदहा वर्षांच्या अल्पकाळात एखादा बाबा आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून गेला, त्याच्या अवतीभोवती साधनांची रेलचेल दिसली, की येथे बाबांच्या भारून टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वापलीकडे आणखीन काही 'मादक' आहे असे गृहीत धरावे.

 सरहद्दीच्या प्रदेशात मादक तस्करीसाठी केवळ मठस्थापना करून भागत नाही, तेथे समांतर सरकारच स्थापावे लागते. आधुनिक शस्त्रास्त्रे आणि इतर साधनसामग्री आणून बेछूट दहशतवादाचे वातावरण तयार करावे लागते. सरकारला

अन्वयार्थ - एक / ७२