पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोट बंदरापासून हलली म्हणजे निर्यातदार हुश्श करतात. व्याही आणि जावयांच्या सगळ्या मागण्यांना तोंड देता देता मुलगी एकदा सासरी रवाना झाल्यावर बापाला हलके वाटावे तशी निर्यातदार शेतकऱ्यांची स्थिती होते. सासरी पाठवणी झाली म्हणजे सगळ्या चिंता मिटल्या असे नाही; पण ती चिंता उद्या माल ठीक पोचेल की नाही? तपासणीच्या दिरंगाईत उष्णतापमान वाढल्याने सगळा माल नासून तर जाणार नाही ना? तसे झाले तर काय होईल? याची धास्ती प्रत्येकाच्या मनात असतेच; पण निदान आजची चिंता मिटली याचे समाधान.
 निर्यात थोपवणाऱ्या फौजा
 द्राक्षाच्या निर्यातीला परवाना लागत नाही तरीही इतकी परवड! ज्या वस्तूंच्या निर्यातीकरिता परवाना लागतो तेथे याशिवाय १९ वेगवेगळ्या खात्यांकडून कागदपत्र मिळवावे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी अधिकाऱ्याचे हात ओले करावे लागतात. द्राक्षाच्या मळ्यावर खत वापरताना, माणसे नेमताना, पैशापैशाचा हिशेब करणारे शेतकरी निर्यात करायची म्हटली, की मजबूर होऊन या सगळ्या ठगांच्या हाती सापडतात. या नोकरदारांवर जो खर्च करावा लागतो तो लक्षात घेतला तर मजुरीचा खर्च इतर कोणत्याही देशातल्यापेक्षा जास्तच होतो.
 देशाच्या अंदाजपत्रकाच्या दोनतृतीयांश भाग सरकारी नोकरदारांच्या पगारावर जातो. त्याकरिता उत्पादकांना कर भरावे लागतात. पगारदार नोकरांकडून काम व्हावे म्हणून त्यांना खुश करण्यासाठी बक्षिसीही द्यावी लागते. यातील बहुतेक अधिकाऱ्यांची वरकमाई पगाराच्या कित्येकपट. एवढे ओझे शिरावर घेतलेला भारतातील उत्पादक आणि निर्यातदार डॉ. मनमोहनसिंगांनी रुपया परिवर्तनीय केला म्हणून धडाक्यात निर्यात करून, परकीय चलन कमावण्याच्या कामाला लागेल आणि देश वाचवेल ही शक्यताच नाही. महाप्रचंड खर्च करून अधिकाऱ्यांची मोठी फौज केवळ उत्पादकांना हैराण करण्यासाठी पोसली जाते. सगळी संबंधित सरकारी खाती बंद केल्याखेरीज यशस्वीपणे निर्यात करणे अशक्यप्राय आहे.

(१९ मार्च १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ६७