पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळी मंडळी चिंतित होती. कंटेनरचा ट्रक मोठा महाग पडतो. त्याचा खोळंबा होऊ नये म्हणून माल भरण्यासाठी मजुरांची एक तुकडी आदल्या दिवसापासून कामावर घेतली होती. कंटेनरची वाट पाहत ही मंडळी विड्या, तंबाखू किंवा सावलीला झोपणे अशा कार्यक्रमात दंग होती.
 अजब जकातदारी
 कंटेनर वेळेवर येण्याची शाश्वती नाही, तो आल्यावर वेळ न दवडता माल भरला पाहिजे आणि माल भरण्याच्या वेळी जकात खात्याच्या इन्स्पेक्टरला हजर ठेवले पाहिजे. त्याच्या देखरेखीखालीच माल भरता येतो, एरवी नाही.

 कंटेनर नाशिकला येऊन पोचल्याचा निरोप फोनवर मिळाला. लगेच एक जबाबदार माणूस गाडी घेऊन तालुक्याच्या शहराकडे रवाना झाला. जकात अधिकाऱ्याला तातडीने घेऊन येण्यासाठी. काही अडथळा येऊ नये म्हणून अधिकाऱ्याला देण्यासाठी द्राक्षाच्या काही पेट्या, बेदाण्याच्या दोन पिशव्या इत्यादी सामान गाडीत भरलेले माझ्या डोळ्यांनी बरोबर टिपले.
 कंटेनर आल्यानंतर तासाभराने जकात अधिकारी आले. त्यांच्याबरोबर त्यांचे एक वरिष्ठ अधिकारीही आले. दोघा अधिकाऱ्यांच्या हातातील सत्ता फार मोठी आहे. द्राक्षाच्या तयार झालेल्या खोक्यांपैकी कोणतेही खोके पुन्हा उघडायला सांगायचा अधिकार त्यांना आहे. अशी कितीही खोकी ते उघडायला सांगू शकतात. खोकी उघडल्यानंतर तपासणीस पाहिजे तितका वेळकाढूपणा करू शकतात. द्राक्षाच्या नावाखाली दुसरेच काही पदार्थ पाठवले जात नाहीत ना याच्याविषयी सरकारच्या वतीने खात्री करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांनी मनात आणले तर सगळ्या मालाचे वाटोळे होईपर्यंत ते तपासणी चालू ठेवू शकतात आणि मनात आणले तर नुसती सही करूनही हिरवा कंदील दाखवू शकतात.
 एक दोन एकर बागायत असलेल्या शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आलेले असतात. म्हणून ते मोठ्या अदबीने त्यांना घेऊन येतात. तपासणीसाठी जितका वेळ लागेल त्यासाठी जकात खात्यास ६० रुपये ताशी आणि आणखी कोणी वरिष्ठ अधिकारी असेल तर त्याची वेगळी फी द्यावी लागते. खात्याला जेवढी रक्कम देणे असेल त्याच्या निम्म्याच रकमेची पावती करून उरलेली रक्कम बिगर पावतीची रोख घेण्यास अधिकारी तयार असतात. सगळे पैसे अधिकृतपणे पावती घेऊन द्यायचा आग्रह धरला तरी अधिकारी 'नाही' म्हणत नाहीत; पण त्यानंतर सगळी तपासणी मोठी कसोशीची आणि दिरंगाईने होऊ लागते. त्यामुळे

अन्वयार्थ - एक / ६५