पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असू शकतच नाही. हा माझ्या विचार करण्याच्या पद्धतीचा पाया आहे. उपनिषदांचे जगभरच्या वाङ्मयात विशेष स्थान आहे. याउलट वेद उपनिषदांपेक्षा वेगळ्या पठडीतील आहेत. उपनिषदांचे 'वेदांती' तत्त्वज्ञान वेदांत सांगितलेल्या संकल्पनांचा उच्छेद करणारे आहे. म्हणूनच त्यांचे 'वेदांत' हे नाव सार्थक आहे असा माझा आग्रह आहे.
 मूर्तिभंजक नाही
 मूर्तीविषयी माझ्या मनात अनादर अजिबात नाही. अलीकडे मी देवळात जातो, पूर्वी जात नसे. नमस्कार वगैरे सहसा करीत नाही वेगवेगळ्या स्थानांतील देवीच्या मूर्ती आणि त्यांच्या डोळ्यांतील बुबुळांची जागा हा माझ्या जिज्ञासेचा एक विषय आहे.
 सर्व धर्माबद्दल माझ्या मनात सारखाच आदर किंवा अनादर आहे. मूळ संस्थापकाच्या काळी प्रत्येक धर्माने एक क्रांतिकारक, ऐतिहासिक कामगिरी बजावली, त्या कामगिरीचा कालखंड संपल्यानंतर बहुतेक धर्मांनी इतिहासाच्या गतीला अडथळे आणण्याचे काम केले. स्वार्थापोटी कोणी केले नसतील इतके अत्याचार, हिंसाचार, बलात्कार, रक्तपात, लूटमार धर्मांच्या नावाखाली घडलेली आहे.
 पुनर्जन्मातून मुक्ती कशी?
 मी पुनर्जन्म मानतो, पदार्थ विज्ञानशास्त्राच्या नियमाने. जडमात्र अविनाशी आहे, तेव्हा पुनर्जन्म या संकल्पनेला कोणी विरोध करू शकेल असे वाटत नाही; पण पुनर्जन्माची ही शास्त्रीय संकल्पना ग्राह्य धरली तर पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका होण्याची काहीही शक्यता राहत नाही. वस्तूचे अविनाशित्व कदाचित अवकाशातील 'ब्लू होल'मध्ये संपत असेल; पण कोणत्याही कर्मकांडाने ते होण्याची काहीही शक्यता नाही.
 विनोबाजींच्या प्रश्नावलीतील आठ प्रश्नांपैकी फक्त प्राणिमात्रांना सुखकारक असे वर्तन ठेवण्याच्या एकाच लक्षणाच्या कसाटीला मी उतरेन असे वाटते. म्हणजे मी लोकांना दुःख देत नाही असे नाही; पण ते दुःख देण्याच्या हेतूने देत नाही. बाकी उरलेल्या सात प्रश्नांपैकी सहा प्रश्नांबाबत माझी परिस्थिती कसेबसे काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी आहे; पण पहिल्या अटीबद्दल मात्र परिस्थिती मोठी कठीण आहे आणि ही अट साधीसुधी नाही. ज्याला आज हिंदू धर्म म्हटले जाते त्याचे एके काळचे नावच मुळी वर्णाश्रमधर्म असे होते. हिंदू धर्मातील इतर कसोट्यांना उतरला नाहीत तरी चालेल; पण वर्णाश्रम धर्मावरील

अन्वयार्थ - एक / ६१