पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मैलाचे. देवालयातील प्रत्येक मूर्तीच्या कपाळावर डोळ्याच्या आकाराचा एक व्रण स्पष्ट दिसतो. वाटाड्याने माहिती पुरवली, या प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण यांच्या लढाया शतकानुशतके चालल्या होत्या. ब्राह्मण जिंकले, की ते बुद्धाच्या मूर्तीच्या कपाळावर तिसरा डोळा कोरून मूर्तीला शंकराची बनवण्याचा प्रयत्न करीत आणि बौद्ध जिंकले म्हणजे ते तिसरा डोळा लिंपून टाकीत.
 मी वाटाड्याला प्रश्न केला, "या लढाया हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये होत होत्या ना?"
 "नाही, नाही," वाटड्याने उत्तर दिले. हिंदू नावाचा धर्म आहे हे त्याने कधी ऐकलेच नव्हते. ब्राह्मण धर्म आहे आणि या धर्माचे लोक भारतातील इतर लोकांवर जरब बसवून अंमल चढवतात असा त्याचा आग्रह होता. ज्योतिबा फुल्यांना त्याचे विवेचन ऐकून आनंद वाटला असता.
 तुम्ही हिंदू आहात?
 डायजेस्ट पद्धतीच्या मासिकात अनेकदा काही प्रश्नावल्या देतात. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात का? तपासून पाहा. नवरा म्हणून तुम्ही कितपत योग्य आहात? पाहा! अशा प्रकारच्या मथळ्याखाली एक प्रश्नावली देण्यात येते. या प्रश्नांची उत्तरे वाचकांनी शक्य तितक्या प्रामाणिकपणे द्यायची असतात आणि मग दिलेल्या उत्तरावरून गुण मोजता येतात आणि वाचक कसोटीला कितपत उतरला याचा निष्कर्ष काढला जातो.
 विनोबाजींनी दिलेल्या व्याख्येच्या कसोटीला आपण कितपत उतरतो हे तपासून पाहण्याचा मला मोह झाला.
 गोभक्त नाही
 गायीचा भक्त? मी भक्त नक्कीच नाही. मी गायी पाळतो आणि गाय हा एक 'उपयुक्त पशू' आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मानतो. त्याबरोबर गोपालनाचा धंदा किफायतशीरपणे करायचा असेल तर छोटे गोऱ्हे, आजारी गायी इत्यादींचा बोजा संपवणे आवश्यक आहे असे मी इतरत्र लिहिलेले आहे. गोवधबंदीला माझा विरोध नाही; पण त्यासाठी अनुत्पादक गायींच्या पोषणाची जबाबदारी सर्वच समाजाने घेतली पाहिजे, एकट्या दूध उत्पादकांना ती पेलणारी नाही. म्हणजे मी गोभक्त नाही; पण गायींचा मला काही रागही नाही.
 वेदान्ती वेद कसा मानेल?
 श्रुती म्हणजे वेद आणि उपनिषद यांचा गाभा. त्यांना मी मातृवत आदरणीय समजत नाही किंबहुना, कोणतेही एक पुस्तक किंवा एक व्यक्ती संपूर्ण निर्दोष

अन्वयार्थ - एक / ६०