पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुळातच खोडसाळ आहे. यहुदी, ख्रिश्चन व मुसलमान हे 'जुन्या कराराला' मानणारे तीन धर्म प्रकृतीनेच बहुराष्ट्रीय आहेत. विश्वाची निर्मिती, धारणा आणि अंत यासंबंधी एक विशिष्ट संकल्पना बाळगणारे जगातील यच्चयावत लोक या धर्माचे अनुयायी असू शकतात. यहुदी, ख्रिश्चन, मुलसमान कोणत्याही देशाचे नागरिक असोत, आपापला धर्म मानतात. भौतिक व्यवस्थेबद्दल त्या त्या देशातील नियम, शिस्त इत्यादी पाळली तर इतर बाबतीत आपापल्या धार्मिक संकल्पना ते सर्वोच्च मानतात.
 ज्याला आज 'हिंदू' धर्म म्हटले जाते तो फक्त एकाच देशात आहे. नेपाळचा किरकोळ अपवाद लक्षात घेण्याचे कारण नाही. त्यामुळे यच्चयावत बाबतीत राष्ट्रीय सत्ताच सार्वभौम मानावी हे हिंदू धर्मीयांना साहजिकच आणि सोयीचे वाटते. इतर धर्मीय साहजिकच एक अर्धा डोळा तरी राष्ट्रीय सरहद्दीच्या पलीकडे ठेवून असतात आणि याचे हिंदूंना मोठे वैषम्य वाटते.
 हिंदू धर्माची सावरकरी किंवा गोळवलकरी व्याख्या हिंदू धर्माचा आशय किंवा मर्म मांडण्याकरिता केली नसून, इतर धार्मिकांना प्रामुख्याने मुसलमानांना डिवचण्यासाठी उभारलेली आहे. हिंदुत्वाचा अभिमान मिरवणाऱ्या व त्याचे राजकारण करणाऱ्या कोणीही भारतीय तत्त्वज्ञानाचे मंथन आणि अवगाहन करून त्यातून नेमका मथितार्थ काढण्याची खटपट केली नाही. कारण धर्म हे त्यांचे क्षेत्र नव्हतेच. राष्ट्रवाद हे त्यांचे मैदान, धर्माचा त्यांनी केलेला वापर एक सोय होती, एवढेच.
 फ्रेंच हिंदू आणि कंबोडियन ब्राह्मण
 विनोबांची ही व्याख्या जगापुढे पुन्हा एकदा ठेवण्याचे काम 'साम्ययोग'च्या संपादकांनी केले, याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे.
 मी स्वतःला कधी हिंदू म्हणवून घेतलेले नाही. १९६८ मध्ये मी एक वर्षभराकरिता फ्रान्स देशात राहिलो होतो. विमानतळावर तपासणीच्या वेळी माझा पासपोर्ट पाहून तिथला अधिकारी म्हणाला, "तुम्ही 'ऐद'हून ('इंडिया'चे फ्रेंच रूपांतर) आलात म्हणजे तुम्ही हिंदू आहात." सरळ हो म्हणून मी मोकळा होऊ शकलो असतो; पण 'हिंदू' आणि 'भारतीय' यांतील फरक त्यांना मी समजावत बसलो. फ्रेंच भाषेत भारतात राहणारे ते सगळे हिंदू, मग त्यांचा धर्म कोणताही असो. 'हिंदू' हा शब्द धार्मिक नसून राजकीय आहे.
 याच्या नेमका उलटा अनुभव कंबोडियातील 'अंकोरवट' देवालये पाहताना आला. प्रचंड देवालये. म्हणजे एका एका देवळाचे प्रांगणच कित्येक चौरस

अन्वयार्थ - एक / ५९