पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हिंदू नसल्याचा अभिमान


 १९५१ मध्ये विनोबाजींनी लिहिलेला एक लेख अलीकडच्या 'साम्ययोग'च्या अंकात पुन्हा छापण्यात आला आहे. 'हिंदू धर्माचा आशय' हे त्या लेखाचे नाव आहे. १९४९ मध्ये तुरुंगात असताना विनोबाजींनी स्वतःच्या चिंतनासाठी हिंदू धर्माची व्याख्या तयार केली होती. या व्याख्येत त्यांचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य नाही, असे विनोबाजी स्वतःच सांगतात. अन्य लोकांनी केलेल्या व्याख्यांमधून काही घेऊन पूर्णता आणण्याच्या दृष्टीने आपण त्यांना जोडले आहे असे विनोबाजींनी म्हटले आहे. हिंदू धर्माची ही व्याख्या स्वतःला समाधानकारक वाटते असेही विनोबाजी म्हणतात.
 हिंदु कोण? तर -
 ज्याची वर्णधर्म व आश्रमधर्म यावर निष्ठा आहे, ज्याचा गोसेवेवर विश्वास आहे, जो श्रुतीला आईप्रमाणे आदरणीय मानतो, जो मूर्तीचा सारखाच आदर करतो, जो पुनर्जन्म मानतो आणि त्यापासून मुक्त होण्याची इच्छा बाळगतो आणि जो सर्व प्राणीमात्रांना सुखकर असा व्यवहार करतो.
 विनोबांनी दिलेली हिंदू शब्दाची व्याख्या ही अशी आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधाराने हिंदू धर्माचा सांगितलेला हा आशय मोठा मनोहारी आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा विनोबाजींचा गाढा अभ्यास या एकाच व्याख्येवरून इतका स्पष्ट होतो, की वाचणाऱ्याचे मन थक्क व्हावे.
 राष्ट्रवादी धर्म
 आजपर्यंत हिंदू शब्दाच्या व्याख्या अनेकांनी दिल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या व्याख्या हिंदू राष्ट्रवाद जोपासण्याच्या बुद्धीने तयार केलेल्या आहेत. समुद्रापासून सिंधुतटापर्यंत सर्व भूभागाला जो आपली मातृभूमी मानतो आणि धर्मभूमी मानतो तो हिंदू अशा प्रकारची व्याख्या

अन्वयार्थ - एक / ५८