पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गनिमी कावा खेळायला काय हरकत आहे? सरकारी नोकरदारांच्या ठगीचा असा फजितवाडा करणाऱ्या बहाद्दरांना मोठे जबरदस्त पारितोषिक दिले पाहिजे. यात स्वतंत्र प्रतिभेला कितीतरी वाव आहे. न घडलेल्या घटनांच्या बातम्या आणि माहितीपट टेलिव्हिजनवरून दाखवण्याची व्यवस्था करणे, मुळात अस्तित्वातच नसलेल्या गावांना साक्षर, दारूमुक्त गाव म्हणून सन्मानपत्रके मिळवणे, न जन्मलेल्या माणसांच्या, पाळण्यातील पोराटोरांचा किंवा जख्खड म्हाताऱ्यांचे कुटुंब कल्याण ऑपरेशन केल्याचा दाखला घेणे, एक ना अनेक, प्रतिभेच्या आविष्काराला भरपूर वाव आहे. ठगीला आळा घालता आला नाही तर निदान एखाद्या ठगाला हास्यास्पद करण्याचे मानसिक समाधान तर मिळेल?
 आमची ऐतिहासिक परंपरा ठगीची आहे. या ठगीस्तानात ठगांच्या कारवायांचा खरोखर बंदोबस्त होईल असे काही लक्षण नाही. या कामात लॉर्ड बेंटिकही चुकला. ठगाकडूनच लुटून घेणे हे आमच्या कपाळावरच लिहिलं आहे; पण लुटून घेता घेता थोडा विनोद करणे यापलीकडे सर्वसामान्य माणसाला वेगळे काही समाधान मिळण्याची आजतरी शक्यता नाही.

(४ मार्च १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ५७