पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जबरदस्त होता, की त्यानंतर इंग्रजांनी देशातील परंपरागत धर्मजातिव्यवस्था, सत्तास्थाने यात ढवळाढवळ करण्याचे बंद करून टाकले. साहजिकच ठगांचा पाठलागही बंद पडला. ठगीचा बंदोबस्त झाला. ठगांचा नाश झाला नाही.
 हे ठग लोक गेले कुठे? ज्यांना लुटायचे त्यांच्यातच मिसळून जायचे कसब त्यांनी पिढीजात अनुभवाने मिळविले होते. इंग्रजांची सगळी नवी व्यवस्था त्यांनी पाहिली आणि आपला धंदा आता शहरे, बाजारपेठा यांच्यामधील निर्मनुष्य प्रदेशात चालू शकणार नाही; पण तो धंदा शहरात, बाजारपेठात चांगला चालेल अशी त्यांनी खूणगाठ बांधली आणि हळूहळू व्यापारउदिमाच्या मिषाने सारी ठग मंडळी शहरात जाऊन वसली. इंग्रज रयतेची लूट करतच होते. इंग्रजांच्या हातात हात मिळवून लुटीचे कसब या शहरातील ठगांनी पक्के आत्मसात केले आणि अगदी थोड्या काळात त्यांनी आपले बस्तान चांगले बसवले. डोंगराळ रानात, दऱ्याखोऱ्यात भ्रमंती करण्याचा त्रास नाही आणि कमाई मात्र भरगच्च अशी ही आधुनिक ठगी मोठी यशस्वी झाली. याला महात्मा गांधींचेच प्रमाणपत्र आहे. "देशातील जनतेला लुटण्याचे काम इंग्रज आणि शहरातील मंडळी इतक्या निर्दयपणे करीत आहेत, की त्यांना आपल्या या पापाचा झाडा परपेश्वराच्या दरबारी कधीतरी द्यावा लागेल," असे तो महात्मा तळतळून बोलला होता.
 ठगीचे पुनरुत्थान
 ठगांचे नवीन व्यवस्थेतील स्थान इतके मोठे होते, की इंग्रज गेल्यावर सगळी सत्ता, सगळे सामर्थ्य पुन्हा त्यांच्याच हाती आले. इंग्रज गेल्यावर सनातन ठगीची पुन्हा सुरुवात झाली आणि थोड्याच काळात देशभर ठगांचे साम्राज्य पुन्हा पसरले. लॉर्ड बेंटिकने ठगीचा बंदोबस्त केला. भारतरत्न जवाहरलाल नेहरूंच्या अमलात ठगीचे पुनरुत्थान झाले.
 हे ठग आता दऱ्याखोऱ्यातून फिरत नाहीत. त्यांना प्रवाशांचा पाठलाग करावा लागत नाही. लढाया तर सोडाच; पण किरकोळ हिंसाचारसुद्धा करावा लागत नाही. कोणत्याही कामाला निघालेली माणसे आपणहून ठगांच्या मुक्कामी येतात, आपणहून ठगांच्या तिजोऱ्या भरतात.
 अवघे ठग माजले
 प्रवासाकरिता निघाले तर त्यांना ठग तिकिटाच्या खिडकीपासूनच भेटतो. ठगाला खुश केले तर तिकीट मिळणार. तिकीट काढल्यानंतर वाटेमध्ये तपासणीस ठग भेटले तर त्यांनासुद्धा खुश करावे लागणार, तेव्हा प्रवास पार पडणार.
 घरी बसून राहिले तरी ठगांची गाठ टाळता येत नाही. साधा ७-१२ चा

अन्वयार्थ - एक / ५५