पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मौल्यवान चीजवस्तू तेवढ्या नेमक्या लुटून नेत. या ठगांचे देशभर जाळे होते. प्रवासी एका टोळीच्या हद्दीतून पलीकडे गेला, की त्याला लुटण्याचा अधिकारही एका टोळीकडून दुसऱ्या टोळीकडे जाई. या सगळ्या ठगांच्या तावडीतून सुटून सुखरूप यात्रा पुरी होणे मोठी दुरापास्त गोष्ट होती.
 काशीयात्रा सुखरूप झाली
 काशी यात्रेला निघायचे म्हणजे सगळी काही निरवानिरव करायची आणि 'या जाण्याशी परतणे न लगे,' अशी भावना ठेवूनच घरातून निघायचे. वाटेत अपघातांची, जंगली जनावरांची इत्यादी भीती तर खरीच; पण खरी भीती ठगांचीच. कोणत्या ना कोणत्या ठगांच्या टोळीच्या हल्ल्यात चीजवस्तू लुटून जाणार आणि त्याबरोबर जीवही जाणार याची जवळजवळ निश्चिती असे.
 बेंटिकने ठगीचा बंदोबस्त केला आणि काठीला सोन्याचे गाठोडे बांधावे आणि बिनधास्त काशीयात्रेला निघावे अशी परिस्थिती इंग्रजांनी तयार केली.
 ठगास भेटला महाठग
 इंग्रजांनी हिंदुस्थानातील सत्ता हातात घेतली, ती कोणाकडून? दिल्लीच्या बादशहाकडून, रणजितसिंह आदी शिखांकडून, पेशावाईकडून की निजामाकडून की राजपुतांकडून? हा इतिहासातील चर्चेत मोठा वादाचा विषय असतो. खरी परिस्थिती अशी आहे, की इंग्रज येण्याआधी बहुतांश देशावर सत्ता होती ती ठगांची आणि त्यांचा बंदोबस्त केल्यानंतरच इंग्रजांच्या हाती खरीखुरी सत्ता आली.
 शिवाजी महाराजांना मोगलांपेक्षा पुंड-पाळेगार, देशमुख इत्यादींशीच लढाया जास्त कराव्या लागल्या, तसेच इंग्रजांनाही राजेरजवाडे, सुलतान, बादशहा यांच्यापेक्षा ठगांना आटोक्यात आणण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले.
 राणीचे राज्य आले, देशात सगळीकडे शांतता नांदू लागली. रस्ते झाले, राजमार्ग झाले. लोखंडी रुळावरून आगगाड्या धाव लागल्या. व्यापारउदीम वाढला. म्हणजे, इंग्रजांनी भारतीय ठगी संपवली आणि इंग्रजी छापाची व्यापारी लुटमारीची पद्धत चालू केली; पण अगदी रानटी पद्धतीची ठगी सोडून थोडी सुसंस्कृत लुटीची पद्धत इंग्रजांनी सुरू केली, 'हेही नसे थोडके.'
 ठगांची नवी आश्रयस्थाने
 पण ठगीचा बंदोबस्त झाला तो लष्करांच्या, पोलिसांच्या किंवा हत्याराच्या मदतीने झाला हे काही खरे नाही. १८५७ च्या बंडापर्यंत ठगांना कह्यात आणण्याचे काम इंग्रज सरकारने मोठ्या जोमाने केले. ५७ च्या बंडाचा तडाखा इतका

अन्वयार्थ - एक / ५४