पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





सामान्य जनता आणि विविध ठगांची टोळी


 लॉर्ड बेंटिकने हिंदुस्थानातील ठगीचा बंदोबस्त केला असे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले होते.
 शाळेतील पुस्तकात अशी अनेक वाक्ये असतात, की ज्यांचा, खरे म्हटले तर, अर्थ मुलाना समजत नाही. अर्थ न समजताच अशी वाक्ये पाठ केली जातात, अशा वाक्यांपैकीच हे एक वाक्य.
 बंदोबस्त करण्यापूर्वीची ठगी म्हणजे काय होती यासंबंधी काही माहिती इतिहासाच्या पुस्तकात मिळत नाही, तिचा बंदोबस्त लॉर्ड बेंटिकने केला एवढेच म्हटलेले असते.
 कठीण जागी हल्ला
 त्या काळात शेरशहा, मलिकंबर आदी लोकांनी रस्ते बांधून बाजूला सावलीसाठी झाडे लावली व प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली असे लिहिलेले असते. किंबहुना, कोणत्याही चांगल्या राजाने किंवा बादशहाने जनकल्याणाची कोणती कामे केली, असा प्रश्न परीक्षेत विचारला तर रस्ते बांधण्याच्या कामगिरीचा उल्लेख बिनधोकपणे सगळे चलाख विद्यार्थी करतात. हे असे राजमार्ग सोडल्यास सडका जवळजवळ नाहीत. जे रस्ते असत त्यावर नदीनाले ओलांडण्यासाठी फार तर सांडवे असत. पूल इंग्रजांनी इथे आणले. दऱ्याखोरी, डोंगरजंगले इत्यादीनींच प्रवासाचा सगळा मार्ग व्यापलेला. शहरे, बाजारपेठा यांच्यामधला सगळा प्रदेश त्यांनीच व्यापलेला. या सगळ्या निर्मनुष्य प्रदेशात राज्य ठगांचेच असे. ठग म्हणजे लूटमार करणारे, जे कोणी यात्रेकरू व्यापारी प्रवासाला निघतील त्यांना कोणत्याही मार्गाने लुबाडणे, त्यांचे धन, आवश्यक तर प्राण, दोन्ही हरण करणे हा ठगांचा धंदा. काही वेळा ते प्रवाशांच्या जथ्थ्यांत, सहप्रवासी म्हणून सामील होत आणि वाटचाल करताना अडचणीचा प्रदेश आला म्हणजे

अन्वयार्थ - एक / ५३