पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पागल आणि समाजद्रोही प्रतिगामी सोडल्यास बाकी सर्वसामान्य माणसांना इतके स्वातंत्र्य आहे, की विचारू नका. तेथे हुकूमशाही आहे असे म्हणणे फक्त भांडवलशाहीच्या भाडोत्री कुत्र्यांनाच शोभते, इ.इ.
 यापुढे जाऊन भाई लोकांचा असा आग्रह असे, की जसजसा काळ लोटेल तसतसे भांडवलदारी देशात हुकूमशाही वाढत जाईल. याउलट समाजवादी देशात एकदा काय वर्ग ही संस्था संपली, की हुकूमशाहीच काय, शासनही विसर्जित होईल आणि एक शासनविरहित समाजाचा साक्षात स्वर्ग उभा राहील, असे मोठे मोहक स्वप्नदेखील चांगले जाणते चिंतनशील समाजवादी विचारवंत मांडीत असत.
 अर्थसत्ता आणि लोकशाही सवती-सवती
 समाजवाद आणि लोकशाही एकत्र नांदू शकतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना समाजवादी देश कोणते याची व्याख्या स्पष्ट असली पाहिजे. पश्चिम युरोपीय देशांतील व्यवस्था ही काही समाजवादी नव्हे. राष्ट्रातील बहुतांश संपत्ती शासनाच्या ताब्यात असेल आणि उत्पादन आणि व्यापार यांच्यावर शासनाचा मोठा ताबा असेल, तरच त्या देशांना समाजवादी म्हणता येईल. कल्याणकारी समाज हे काही खऱ्या अर्थाने समाजवादी नाहीत. ज्या शासनाकडे आर्थिक सत्ता एकवटलेली असते तेथे लोकशाही व्यवस्था टिकूच शकत नाही, अशी माझी खात्री झाली आहे. समाजवादी क्रांती इंग्लंडसारख्या देशात होणे कठीणच होते; पण इंग्लंडमध्ये समाजवादी क्रांती झाली असती, तर तेथेही हुकूमशाही तयार झाली असती.
 पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला आणि त्या देशावर आर्थिक अरिष्ट कोसळले. त्या अरिष्टावर मात करण्यासाठी राष्ट्रभक्ती, वंशविद्वेष आणि आर्थिक सत्ता या आधाराने हिटलरी नाझीवादाचा भस्मासुर उभा राहिला. तेथे तर काही समाजवाद नव्हता, तरीही हुकूमशाही अवतरली. आर्थिक सत्ता शासनाकडे एकवटली, की लोकशाही अस्त पावणार हे नक्की.
 भारतातील सध्याची परिस्थिती पाहता, या सिद्धांताबद्दल अधिक खात्री वाटते. ज्या शासनाच्या हाती आर्थिक सत्ता आहे आणि तेथील शासक लोकांच्या संमतीने निवडणुकांनी ठरतात त्या निवडणुका या खऱ्याखुऱ्या लोकशाही स्वरूपाच्या राहतच नाहीत.
 सत्तेचा जादूचा दिवा
 अरबी भाषेतील सुरस कथेत वारंवार जादूच्या दिव्याचा उल्लेख होतो.

अन्वयार्थ - एक / ४६