पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एखाद्या शिंप्याचा किंवा न्हाव्याचा उनाड मुलगा. त्याला घरातून हाकून लावले आणि नंतर जादूच्या दिव्याचा राक्षस त्याच्या नशिबाने हाती आला म्हणजे त्याला संपत्ती मिळते, स्वरूपवान राजकन्याही मिळते, एवढेच नव्हे तर शूर आणि विद्वान म्हणूनही त्याची ख्याती होते.
 आर्थिक सत्ता आणि लोकशाही एकत्र राहिली तर सत्तेची खुर्ची म्हणजे जादूचा दिवा बनतो. परीक्षेत नापास झालेला टवाळ पोरगा कोणत्यातरी पक्षात गेला आणि पाचपन्नास लोकांना जमा करून, हळूहळू सत्तेच्या खुर्त्या काबीज करू लागला म्हणजे त्याच्या हाती पैसाही येतो. त्या पैशाच्या आधाराने आणखी सत्ता मिळवू शकतो. सत्ता असली तर सगळे काही आहे, वैभव आहे, मानमान्यता आहे. वाटेल ती अपकृत्ये केली तरी संरक्षण आहे. असा हा जादूचा दिवा, तो हाती यावा यासाठी कोण धडपडणार नाही? रसाळ, सुगंधी फळ असले, की त्याला कीड पहिल्यांदा लागते, तसाच हा प्रकार आहे.
 सत्तेसाठी कोण काय करील हे सांगता येत नाही. स्वातंत्र्य आंदोलनाची सर्व पुण्याई पाठीशी असताना काँग्रेसला सत्ता संपादन करण्याची भावना का व्हावी? भारताची ऐतिहासिक परंपरा पाहता लोकशाही टिकण्याची संभावना काही वाईट नव्हती. भारतीय लोकशाहीवर पहिला हल्ला केला तो इंदिरा गाधींनी, १९५२ मध्ये. केरळातील लोकांनी निवडून दिलेले साम्यवादी सरकार पुरे पाच वर्षे टिकले असते तर काही मोठी जगबुडी येणार नव्हती. बंगालमध्ये साम्यवादी सरकार सतत निवडून येत आहे. त्यांनी काही साम्यवादी गोंधळ घातलेला नाही. उलट ज्योती बसू हे सर्वांत भांडवलदारी मुख्यमंत्री आहेत असे म्हटले जाते; तरीही केरळातील कम्युनिस्ट सरकार दंग्याधोप्याने पाडण्याचा मोह इंदिरा गांधींना झाला. विरोधी पक्षाचे सरकार म्हणून टिकू द्यायचे नाही असा काँग्रेसने सतत प्रयत्न केला आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे सरकार बेकायदेशीररीत्या पाडण्यात आले नसते, तर काश्मीरमधील परिस्थिती आजच्याइतकी चिघळण्याचे काही कारण नव्हते. सत्ता टिकवण्याकरिता काँग्रेसने घराणेशाही तयार केली, भिंद्रानवाल्यांचे भूत उभे केले, अयोध्येत शिलान्यासाला परवानगी दिली, शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धुडकावून लावला, आणीबाणी लादली, लाखो लोकांना तुरुंगात टाकले, भारतीय लोकशाही परंपरा तोडण्याची सुरुवात काँग्रेसने केली आणि आजही त्यांची पराकाष्ठा चालूच आहे.
 साम्यवाद्यांनी तेलंगणापासून नक्सलबारीपर्यंत प्रत्यक्ष सशस्त्र उठाव करून बघितले. काँग्रेसच्या हातातील नेहरू घराण्याच्या हुकमी पत्त्याला तोड म्हणून

अन्वयार्थ - एक / ४७