पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





लोकशाहीची सवत अर्थसत्ता


 साम्यवादी आजकाल मीमांसा करतात, "साम्यवादाचा पराभव झाला याचे कारण समाजवादी देशात दुर्दैवाने हुकूमशाही आली. समाजवादी देशातील लोक रस्त्यावर आले ते समाजवादाविरुद्ध नाही, हुकूमशाहीविरुद्ध. समाजवादी व्यवस्थेमध्ये हुकूमशाही असली पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. सोवियत युनियनमध्ये हुकूमशाही आली. याचे कारण, फार पुरातन काळापासून रशियाची राजकीय संस्कृतीच क्रूर हुकूमशाहीची आहे. पहिली समाजवादी क्रांती इंग्लंड किंवा जर्मनीसारख्या देशात झाली असती तर साम्यवादाचा लोकशाही अवतार पाहायला मिळाला असता."
 कामगारांची हुकूमशाही म्हणजे स्वातंत्र्य
 हुकूमशाही ही भयानक गोष्ट आहे एवढे त्यांना मान्य झाले, हेही काही कमी नाही. समाजवादी साम्राज्य कोसळायच्या आधी हीच मंडळी तेथे सुल्तानशाही चालू आहे हेच मुळी मान्य करीत नसत. तेथील लोकांना स्वातंत्र्य नाही, काही हक्क नाहीत, कोणाचीही धरपकड केव्हाही होऊ शकते, कोणाचाही जीव केव्हाही घेतला जाऊ शकतो; एवढेच नव्हे तर हजारो लोकांचे शिरकाण तेथे सतत होतच असते, असे स्पष्ट पुरावे मिळाले तरी कॉम्रेड लोक ते मानायला तयारच होत नसत. त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी, की हे सगळे खोटे आहे, हा सगळा भांडवलदारांचा आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा भाडोत्री प्रचार आहे हो! थोडीफार हुकूमशाही असेल; पण ती आवश्यकच आहे, कारण समाजवादी देशांना भांडवलदारी देशांनी घेरून टाकले आहे. समाजवादी क्रांती स्थिर होईपर्यंतच ही हुकूमशाही चालेल; पण भांडवलदारी देशांमध्ये मक्तेदार आणि त्यांची पिलावळ लोकांना बेकारी, दारिद्र्य यांच्या खाईत लोटतात, तेथील आचार, विचार, प्रचाराचे स्वातंत्र्य निव्वळ दिखाऊ आहे, याउलट समाजवादी देशात काही माथेफिरू,

अन्वयार्थ - एक / ४५