पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/379

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मदत मागायला सुरुवात केली. नुसती आर्थिक मदत नाही, शस्त्रास्त्रांचीदेखील.
 या शंभरावर देशांत टोळ्यांची, जातींची, धर्मांची, प्रदेशांची, भाषांची इत्यादी अनेक भांडणे होती. परकीय सत्ताधाऱ्यांच्या अंमलाखाली ही भांडणे थोडी दबून होती. स्वातंत्र्यानंतर ती उफाळून आली आणि पूर्वी सुरे, चाकू, लाठ्याकाठ्या, या साधनांनी होणारे दंगे मशिनगन, टॅंक, विमाने आणि बॉम्ब यांच्या साहाय्याने होऊ लागले. आर्थिक मदतीपेक्षाही या वसाहतीतील नव्या सत्ताधाऱ्यांना शस्त्रास्त्रांच्या मदतीची गरज होती. शेजारच्या देशांना धाकात ठेवण्यासाठी आणि त्याहीपेक्षा देशातला बंडावा मोडून काढण्यासाठी.
 नवे पंतप्रधान, अध्यक्ष आणि सुलतान यांच्या पैशाच्या आणि हत्यारांच्या मागण्या मोठ्या जबरदस्त. कितीही पुरवठा केला तरी समाधान होणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे हे महात्मे सदा असंतुष्ट. या असंतोषाचा फायदा समाजवादी देशांनी बरोबर उचलला आणि त्यांना चुचकारायला सुरुवात केली आणि लवकरच काही देश पाश्चिमात्यांचे अंकित तर काही समाजवाद्यांचे. काही या संरक्षण गटात तर काही त्या संरक्षण गटात अशी जगाची विभागणी झाली.
 पण एका गटाला आपली निष्ठा अर्पण करणे फारसे सोयीचे किंवा फायद्याचे नव्हते. एक गट स्वीकारला म्हणजे तेथे जे काही तुकडे पदरात पडतील त्यावर समाधान मानून राहावे लागे. घरच्या लक्ष्मीला मिळेल त्यावर समाधान मानावे लागते. दोन्ही धनिकांकडे मागणी करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले म्हणजे दोघांनाही एकमेकांचा धाक दाखवून जास्त लभ्यांश पदरात पाडून घेता येतो. अशा हिशेबाने 'अलिप्ततावादाच्या' झेंड्याखाली 'नाम' चळवळीचा उगम झाला आणि जवळजवळ ३५ वर्षे या राष्ट्रांच्या शासनांनी आपापल्या जनतेस लुटण्याचे आणि दोन धनिक गटांकडून मदत उकळण्याचे कार्य व्यवस्थित पार पाडले.
 धनिक राष्ट्रांनाही या परिस्थितीत काही करता येण्यासारखे नव्हते. तिसऱ्या जगातील सुलतान हे त्यांच्या लोकांचे प्रतिनिधी नाहीत. बहुतेक ठिकाणी सत्ता उपटसुंभ लष्करशहांच्या हाती आहे, जिथे लोकशाहीचा मुखवटा तरी आहे. तेथे काही घराणी स्वतःची लयलूट करून घेत आहेत. येथे पैशाचा केवढाही मोठा ओघ सोडला, तरी या देशांचा विकास होणे सुतराम शक्य नाही. हे दोन्ही धनिक गटांना चांगले ठाऊक होते; पण राजकीय परिस्थिती अशी अडचणीची, की दोघांनाही तोंडावर हसू आणून प्रसंग साजरा करून न्यावा लागत होता.

 समाजवादी देशांनी समाजवादातून विकासाची आरोळी दिली. सर्व देशांच्या आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या नाड्या हाती घेण्यासाठी ही मोठी आकर्षक

अन्वयार्थ - एक / ३८०