पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/377

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सध्याची नाम (धाऱ्यांची) परिषद


 कार्ता येथे अलिप्त राष्ट्रांची 'नाम' परिषद पार पडली. म्हणजे एक 'नेमेचि' येणारे आन्हिक उरकले. अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद इंडोनेशियातच बांडुंग येथे झाली. त्यावेळी चौ एन लाय, नेहरू, नासेर अशी दिग्गज व्यक्तिमत्त्वे हजर होती. एका नव्या युगाच्या उदयाची स्वप्ने पाहणारी होती. आताच्या जकार्ता बैठकीस हजर राष्ट्रनेते सगळी किरकोळ माणसे. एका कालखंडाच्या अकस्मात अस्ताने कुंठित झालेली.
 बिन तटांचे तटस्थ
 समाजवादी साम्राज्य अकस्मात पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. जगातील आर्थिक आणि लष्करी सत्ता आता पश्चिमी देशात एकवटली आहे आणि तिचे केंद्र अमेरिकेत आहे. 'नाम' चळवळीच्या चढत्या काळात जागतिक सत्तेची दोन केंद्रे होती. समाजवादी देश म्हणजे दुसरे जग असे मानले जाई. पाश्चिमात्य देशांच्या खालोखाल आर्थिक सत्ता आणि त्यांच्याबरोबरीचे लष्करी सामर्थ्य समाजवादी गटाकडे आहे, असा समज होता. "समाजवादी, भांडवलशहांना नेस्तनाबूत करणार," असे क्रुश्चेव राष्ट्रसंघाच्या महासभेत हातात जोडा घेऊन गर्जत होता; पण आता झाकली मूठ उघडली गेली आहे. समाजवादी देश तिसऱ्या जगातील देशांच्या बरोबरीने हातात 'भिक्षापात्र' घेऊन उभे आहेत. दोन तटच नाहीत तर तटस्थता कसली?
 जुन्या सवयी

 या प्रश्नावर सगळीकडे चर्चा चालू आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेस तटस्थ राष्ट्रांची परिषद 'नाम' असली काय, नसली काय फारसे सोयरसूतक नाही; पण सरकारच्या आसपासची विद्वान, प्राध्यापक मंडळी, माजी राजदूत इत्यादी इत्यादी मोठमोठे लेख लिहून परिसंवाद भरवून या प्रश्नांची चर्चा करीत आहेत.

अन्वयार्थ - एक / ३७८