पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/375

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३) जमाते इस्लाम  हो  नाही
४) शिवसेना  हो  नाही
५) दलित पँथर  हो  नाही
६) भा. रि. प.  हो  नाही
७) भा. ज. प.  हो  नाही
८) मा. क. प.  हो  नाही

 जातीयवादी कोण हे ठरवायचे कसे? जातीयवाद ओळखावा कसा? काही फूटपट्या स्पष्ट असल्या पाहिजेत.
 मदायत्तम हि पौरुषम्
 मनुष्याची पात्रता, श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्माने ठरते, असे वर्षानुवर्षे वर्णाश्रमधर्म मांडीत आला आहे. जीवशास्त्रात याला फार थोडा आधार आहे. जन्मतः माणसामाणसांत फरक असतोच. दोन जुळे भाऊसुद्धा संपूर्ण सारखे नसतात; पण मनुष्य ही उत्क्रांतीतील सर्वोच्च अवस्था आहे. जन्मजात गुणांपेक्षा अभ्यासाने, प्रयासाने आणि तपस्येने मिळवलेल्या गोष्टीच महत्त्वाच्या असतात. हे जो मानत नाही तो जातीयवादी. थोडक्यात, जन्मजाताच्या अपघाताने माणसांना मोजू पाहतो, म्हणून तो जातीयवादी.
 रोगाचे निदान वेगळे, औषध वेगळे

 आपल्या देशातील आजपर्यंतचा बहुतेक इतिहास हा जातीजातीतील संघर्षाचा आणि शोषणाचा आहे, असे मी मानतो. यात वाद असण्याचे कारण नाही; पण कदाचित वेगळे मत असू शकेल. जातीव्यवस्थेचे कालमान परिस्थितीप्रमाणे ऐतिहासिक समर्थन काही विद्वान करतात. परवा परवापर्यंत सगळे मार्क्सवादी जाती विश्लेषण मान्य करीतच नव्हते. सगळा इतिहास वर्गसंघर्षाचाच आहे म्हणत होते. इतिहासाचे 'पोस्टमॉर्टेम' काहीही दाखवो, जुन्या रोगांचे निदान काहीही असो, औषध जुनेच असले पाहिजे असे नाही. जातीव्यवस्थेचे दोष दूर करण्याकरिता जातीधर्मानुसार जनांची निष्ठा ठरवणे आणि त्यानुसार मोर्चेबांधणी करणे हा जातीयवादाच. जात्यंताच्या घोषणा देणारा जातीयवाद एवढेच!
 "श्रीनगरला पाकिस्तानचा झेंडा फडकला, यच्चयावत मुसलमान जन्माला आलेल्यांची कत्तल करा म्हणणारे ते जातीयवादी." "एका शिखाने इंदिराबाईंची हत्या केली मग सगळ्याच शिखांना शिक्षा झाली पाहिजे," असे म्हणतात ते जातीयवादी. आमच्या धर्माचा बोलबाला झाला पाहिजे, आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे, असे म्हणतात ते जातीयवादी. कारण यातील सगळ्यांचा धर्म यांना

अन्वयार्थ - एक / ३७६