पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/372

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



दैवायत्तं कुले जन्मं


 रंगीबेरंगी गिधाडे
 १९८८च्या शेवटास सांगली येथील शेतकऱ्यांच्या एका भव्य शेतकरी मेळाव्यात विश्वनाथ प्रताप सिंगांच्या उपस्थितीत मी धोक्याची सूचना दिली होती. नेहरू अर्थव्यवस्था कोसळते आहे. शेतकऱ्यांचा सूर्योदय होत आहे; पण सावध राहा! जातीयवादी गिधाडे उगवत्या सूर्याचा ग्रास करायला येणार आहेत. भली प्रचंड गिधाडे ! हिरवी, भगवी, पिवळी, निळी, वेगवेगळ्या रंगाची, जातीवादी गिधाडे घिरट्या घालू लागली आहेत.
 काही नाराज, काही खुष
 या माझ्या वाक्याने अनेकांचा संताप संताप झाला. काही दिवसांपूर्वी म्हणजे माझ्या भाषणानंतर जवळजवळ तीन वर्षांनी, सांगलीला बोलताना बाळ ठाकऱ्यांनी, "आम्हाला गिधाडे म्हटले," म्हणून मोठा आरडाओरडा केला.
 याउलट दुसरी काही मंडळी माझ्यावर भलतीच खुष झाली. रिपब्लिकन पक्षाचे एक नेते मला भेटायला लगोलग आंबेठाणला आले आणि मला पाहताच मोठ्या प्रसन्नपणे हसून म्हणाले, "तुमचे अभिनंदन करायला मी मुद्दाम इथपर्यंत आलो. जातीयवाद्यांना तम्ही 'गिधाडे' म्हटलेत अगदी योग्य केले!"
 "अभिनंदनाबद्दल धन्यवाद," मी म्हणालो; "पण माझ्या बोलण्याबद्दल तुम्हाला आनंद व्हायचे काय कारण? जातीयवादी गिधाडांचे वेगवेगळे रंग सांगताना भगवा, हिरवा, पिवळा यांच्याबरोब निळ्या रंगाचाही मी उल्लेख केला आहे हे विसरू नका."

 दलित नेते अगदी गोंधळून गेले. आपल्याला कुणी जातीयवादी म्हणेल ही कल्पनाही कधी त्यांच्या मनाला शिवली नव्हती. 'जातीयवादी' म्हणजे त्यांनी इतरांना द्यायची खास त्यांच्या हक्काची शिवी. तो त्यांच्याकडेच उलटून आल्यावर

अन्वयार्थ - एक / ३७३