पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/366

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजरोसपणे उचलून घेता आलेच पाहिजे. एवढेच नव्हे, तर या उचलेगिरीच्या कामाला सगळ्या सोयीसवलती, सुविधा मिळायला पाहिजे. इतक्या की, या संशोधनाच्या मालकांनी आपणहून ते संशोधन ते आमच्या हवाली केले पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचा प्रतिबंध असता कामा नये, असे मोठे डौलाने म्हटले जाते. डंकेल प्रस्तावाच्या विरोधकांचे युक्तिवाद हे सुशिक्षितांच्या गुन्हेगारीला ब्रह्मकर्माचे स्थान देणारे आहेतच.
 सर्व खिसेकापूंना आणि अगदी हर्षद मेहतांना देण्यासारखा सल्ला एकच, 'बाबाहो! इतके धोका असलेले चौर्यकर्म तुम्ही का करता? विद्यापीठात जा, संशोधन शाळांत जा. खुलेआम चोऱ्या करा. फायदा अफाट आहे. धोका काही नाही. विशेष माहिती आणि सल्ल्यासाठी डंकेल विरोधकांना भेटा.
 धन्य ते चौर्य जाणावे।
 अब्रू जे जगी वाढवी
 धिक धिक चौर्य मित्रा
 जे नाव लौकि घालवी
 (केशवकुमार)

(दि. २८ ऑक्टोबर १९९२)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३६७