पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/365

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इंग्रजी पुस्तकातील कवींच्या कल्पना हूबहू उत्तरवून मराठीत काव्यसंपदा साधणाऱ्यांचा एक मोठा जमाना होऊन गेला. केशव कुमारांनी असल्या कावड्यांची भंबेरी उडवली. 'कवी आणि चोर' या कवितेत त्यांच्यातील साम्य दाखविले; पण कवी आणि लेखकांच्या चौर्यकाला कुठे सक्तमजुरीची शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. उचलेगिरी करून कवी आणि लेखक केवळ धनच नाही, मानसन्मानही मिळवतात.
 ना.सी. फडके यांचे 'प्रतिभासाधन' हे गाजलेले पुस्तक एका पाश्चिमात्य ग्रंथावरून सरळसरळ घेतल्याचे सिद्ध झाले. फडक्यांचे थोडे हसे झाले; पण त्यांना काही तुरुंगात जावे लागले नाही. आजही वाङ्मय - चौर्याचा धंदा राजरोस चालू आहे. इंग्रजी पुस्तकातून चोरणे आता फारसे सुरक्षित राहिले नाही; पण एखादी रशियन, फ्रेंच, जपानीसारखी भाषा येत असली तर त्या भाषांतून चौर्य करण्यात धास्ती काहीच नाही. केशवकुमारांचीच ओळ आहे : "परवाङ्मयाची भांडारे, आम्हासाठीच ना बरे! खुली तयाची तुजला द्वारे, चिंता न करी."
 शास्त्रज्ञांच्या चोऱ्या
 वाङ्मयाच्या बाबतीत जे खरे तेच संशोधनाच्या बाबतीत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा विषयांत गेल्या पन्नास वर्षांत हजारो डॉक्टरेटचे प्रबंध झाले असतील; पण त्यात काही स्वतंत्र मांडणी केलेला प्रबंध शोधायला गेले, तर सापडणे जवळजवळ अशक्य. "परीक्षा म्हणजे एका ठिकाणची चोरून केलेली कॉपी आणि प्रबंध म्हणजे पाच-पन्नास ग्रंथांतून केलेली राजरोस चोरी!" असे विश्वविद्यालयातील विद्वान मंडळी उघडपणे मानतातच. फक्त समाजशास्त्रीय विषयातच हे खरे आहे, असे नाही. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इ. भौतिकशास्त्रातही हा उचलेपणाचा धंदा करून अनेकजण स्वतंत्र प्रतिभेचे शास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावले आहेत. त्यांनी केलेल्या चौर्य कर्माला शिक्षा तर सोडाच मान्यता आहे.

 'एकाचा वध म्हणजे खून, हजारोंची राजरोस हत्या म्हणजे देशप्रेम,' असे सीझरचे वाक्य आहे. तो नियम सुशिक्षितांच्या चौर्यकर्मासही लागतो. त्यांनी केलेली चोरी गुन्हा तर नाही; पण त्यांचे चौर्यकर्म हे एक थोर कार्य आहे. ही एक देशसेवा आहे. असे जाहीररित्या प्रतिपादन केले जाते. परदेशातील शास्त्रज्ञांनी आणि संस्थांनी कोट्यवधी रुपये खर्चुन अथक परिश्रमांनी संशोधन केलेले असो, त्यांच्याकडून उचलून घेण्याचा आम्हाला हक्कच आहे. आम्हाला ते

अन्वयार्थ - एक / ३६६